Thu, Apr 25, 2019 13:36होमपेज › Pune › मेट्रोसाठी झाडे हटविल्याने दुभाजक पडले ओस 

मेट्रोसाठी झाडे हटविल्याने दुभाजक पडले ओस 

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 12:54AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पुणे मेट्रोचे शहरात वेगात काम सुरू आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते शंकरवाडीपर्यंतच्या दुभाजकावरील अडथळा ठरणारे 60 पैकी 40 झाडे मेट्रोने हटविली आहे. त्या झाडांचे दुसरीकडे यशस्वीपणे पुनर्रोपण केले जात आहे. मात्र, हिरवाईने नटलेली झाडे हटविल्याने सदर दुभाजक ओस पडला आहे. 

मेट्रोचे मोरवाडी, पिंपरी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत वेगात काम सुरू आहे. या मार्गावर सर्वच ठिकाणी मेट्रोचे पूर्ण व अर्धवट पिलर दृष्टीस पडत आहेत. वल्लभनगरच्या पुढे शंकरवाडी येथून मेट्रो मार्गिका उजवीकडे वळण घेणार आहे. ग्रेडसेपरेटर व सर्व्हिस रस्त्यामधील दुभाजकावरून मार्गिका आहे. तसेच, कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मेट्रोचे स्टेशन बनविण्यात येणार आहे. भोसरी- पिंपळे गुरव उड्डाणपुलावरून मार्ग जाऊन कासारवाडी भुयारीमार्गाच्या पुढे मेट्रो मार्गिका डावीकडे वळणार आहे.

तेथून पुढे पुन्हा मार्गिका ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावरून जाईल.  पिंपरी ते दापोडी मार्गावर तब्बल 106 झाडे मेट्रोला अडथळा ठरत आहेत. तर, 63 झाडे कापावी लागणार आहे. मात्र, त्याचेही पुनर्रोपण करण्यावर मेट्रोचे प्रयत्न असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. त्यापैकी शंकरवाडी ते नाशिक फाटा चौकापर्यंतच्या सुमारे 500 मीटर अंतराच्या दुभाजकावरील तब्बल 60 मोठी झाडे मेट्रो मार्गिका व स्टेशनच्या कामाचा आड येत आहेत. त्या झाडांचे आयुष्यमान 3 वर्षे ते 40 वर्षे आहे. आतापर्यंत मोहगनी, पेलटॉपहोरम, कदम्ब, गुलमोहर, खाया या जातीचे एकूण 40 झाडे स्थलांतरीत केली.  ती झाडे कासारवाडीतील मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील जागेत पुनर्रोपण केली आहेत. पुनर्रोपण केलेली आतापर्यंतची सर्व झाडे जगली असल्याचा दावा मेट्रो व्यवस्थापनाने केला आहे. 

 पालिकेची रीतसर परवानगी घेऊनच मेट्रोची मार्गिका व स्टेशनच्या कामात खरोखरच अडथळा ठरणारी झाडे अंतिम टप्प्यात काढण्यात येत आहेत. मुळाभोवती बुंधा तयार करून मोठी झाडे क्रेनने काढून ट्रकमध्ये वाहून नेली जात आहेत. या झाडांचे कासारवाडीतील मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, फुगेवाडीतील मेट्रो कार्यालय, वल्लभनगरचे सहयोग केंद्र आदी ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 126 झाडांचे यशस्वीपणे पुनर्रोपण केले आहे, असे महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे वृक्ष व उद्यान विभागाचे व्यवस्थापक बी. जी. माने यांनी सांगितले.