Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Pune › पावसामुळे ‘एसटी’च्या अनेक फेर्‍या रद्द

पावसामुळे ‘एसटी’च्या अनेक फेर्‍या रद्द

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात सर्वदूर पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वेळापत्रक सोमवारी कोलमडून पडले. पुण्यातून ठाणे, बोरिवली, दादर, कोल्हापूर, कोकण, महाबळेश्वर, वाईसह अन्य काही भागात येणार्‍या-जाणार्‍या बहुतांश बस सोमवारी दिवसभर उशिराने धावत होत्या. तर अनेक बस वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढवली. 

पुण्याच्या स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथील स्थानकातून राज्यभरात एसटी सोडल्या जातात.  सोमवारी  पावसामुळे प्रामुख्याने मुंबईकडे जाणार्‍या एसटी वाहतुकीवर परिणाम झाला. तिन्ही बसस्थानकातून सकाळी वेळापत्रकानुसारच बस सोडण्यात आल्या. परंतु,  मुसळधार पावसामुळे या बस मुंबईत उशिरा पोहोचल्या. त्यामुळे पुण्यात परतणार्‍या एसटी बसेसलाही तब्बल दोन ते अडीच तासांचा उशीर झाला. दुपारनंतर मुंबईसह ठाणे, दादर व बोरिवली मार्गावरील सेवेवर परिणाम झाला.  पुण्यातही पावसाचा जोर वाढल्याने अनेक प्रवाशांनी एसटीने प्रवास करणे टाळल्याचे दिसून आले. शिवाजीनगर स्थानकातून मुंबईकडे जाणार्‍या 10 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तर स्वारगेट बसस्थानकातूनही मुंबईला जाणार्‍या सुमारे 7 ते 8 फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. महाबळेश्वर व वाई परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांवरील काही पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे तेथे जाणार्‍या एसटीला देखील विलंब झाल्याची माहिती एसटीच्या एका अधिकार्‍याने दिली.   

रेल्वे उशिराने धावल्या 

सोमवारी झालेल्या पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर मात्र फारसा जाणवला नाही.  पावसामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणारी एकही रेल्वे रद्द करण्यात आली नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मात्र पुण्याहून मुंबईला जाणार्‍या डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेसला सुमारे अर्धा तास उशीर झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, पुणे-लोणावळा लोकलसह पुण्यातून सुटणारी कोणतीहीलांब पल्ल्याची गाडीही रद्द केली गेली नाही किंवा मार्गही बदलण्यात आला नाही.