होमपेज › Pune › केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले

केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येथून आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीच्या भावात प्रतिकिलोमागे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून आगामी काळात या सर्व जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. 

केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज, तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या जिनसांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे. दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापुर्वी शेतकर्‍यांनी घेतले असून बहुतांश मालाचा गोडाऊनमध्ये साठा करून ठेवण्यात आला आहे. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने  90 टक्क्यांहून अधिक माल भिजल्याने त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसत असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांची आवक झाली नसल्याचे सांगून व्यापारी चंद्रकांत लेले म्हणाले, सध्यस्थितीत बाजारात शिल्लक असलेल्या मालाची विक्री करण्यात येत आहे. केरळ येथील गोदामांमध्ये ठेवलेल्या मालालाही पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणार्‍या मसाल्याच्या जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत जायफळ प्रतिकिलोमागे 200 रुपये, जावित्री 400 रुपये, काळीमिळी 50 ते 60 रुपये, सुंठ 50 रुपये तर विलायची 200 ते 250 रुपयांनी महागली आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.