Fri, Mar 22, 2019 07:48होमपेज › Pune › भरमसाठ वीज बिलांमुळे मुळशीतील शेतकरी त्रस्त

भरमसाठ वीज बिलांमुळे मुळशीतील शेतकरी त्रस्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीतील पाणी मोटार पंपाचे मीटरचे रीडिंग  महावितरणच्या वतीने दर महिन्याला होत नाही. अंदाजे बिल दर महिन्याला शेतकर्‍यांना दिले जाते, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याची तक्रार   वंदेमातरम शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील महावितरणाच्या विद्युत उपअभियंता कार्यालयातून शेतकर्‍यांना अंदाजे वीज बिले दिली जातात. अधिकार्‍यांकडून दर महिन्याला किंवा तीन महिन्याला मीटर रीडिंग केले जात नाही. यामुळे शेतकर्‍यांना भरमसाट वीज बिल येत आहे. अधिकार्‍यांचा हा मनमानी कारभार थांबविण्यासाठी लक्ष घालावे. संबंधित अधिकार्‍यांना  व्यवस्थित मीटर रीडिंग करून घरपोच वीज बिले वाटपाचे आदेश द्यावेत, असे पायगुडे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

तालुक्यातील नेरे गावातील विद्युततारा व यंत्रणा जुनी झाली असून, त्याचा फटका गावकर्‍यांना बसत आहे. सतत वीजपुरवठा बंद होणे, शॉटसर्किट होणे, विद्युततारा गळून पडणे अशा दुर्घटना घडत आहेत. नेरेतील  विद्युततारा 1977-78 मध्ये बसविण्यात आल्या आहेत; मात्र 2010 पासून शॉटसर्किटमुळे या तारा गळून पडत आहेत.  गेल्या चार दिवसांपासून  वीजपुरवठा रोज खंडित होतो. त्यामुळे ऊस व कांदा पिकाला पाणी न देता आल्याने ती करपत आहेत. परिणामी, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.