Wed, Jul 17, 2019 20:25होमपेज › Pune › तटबंदीच्या दुरवस्थेमुळे दिवे घाटात अपघाताचा धोका

तटबंदीच्या दुरवस्थेमुळे दिवे घाटात अपघाताचा धोका

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 12:56AMफुरसुंगी : विकास भागीवंत 

हडपसर-सासवड मार्गावरील दिवे घाटाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या झालेल्या दुर्लक्षामुळे या घाटातील तटबंदीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धोकादायक दरड व बाजूची तटबंदी यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. 

दिवे घाटात अनेक ठिकाणी तटबंदीच शिल्लक राहिली नसल्याकारणाने भविष्यात याठिकाणी मोठा अपघात होऊन वाहन खोल दरीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे 4 कि.मी. लांबीचा असणारा हा घाट वाहतुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असूनसुद्धा त्याच्याकडे संबंधित खात्याच्या झालेल्या दुर्लक्षामुळे त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विविध वाहनांच्या धडेकेने घाटाची तटबंदी अनेक ठिकाणी कोसळली आहे, तर घाटाच्या मध्यापासून ते पायथ्यापर्यंत तटबंदीच्या नावाखाली नुसते काही दगड एकमेंकावर रचून तटबंदी उभारण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळेस तटबंदीचा अंदाज येण्यासाठी तटबंदीवर लावण्यात येणारे रिफ्लेक्टरही याठिकाणी कोठे आढळून येत नाही. घाटात पथदिवे नसल्याने याठिकाणी रात्री-बेरात्री लुटमारीच्या घटनाही अधुनमधून घडत असतात. घाटाच्या पायथ्याशी दहा वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पोलिस मदत केंद्रही गेल्या कित्येक वर्षांपासून वापराविना बंद अवस्थेत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे रस्त्यावरील पांढर्‍या रंगाचे पट्टेही कोठे आढळून येत नाहीत. घाटातील अनेक ठिकाणच्या दरडीही धोकादायक झाल्या असून अधुनमधून दरडीचे लहान-मोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. 

दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळाही याच घाटामार्गे मार्गक्रमण करीत असतो. याशिवाय जेजुरी, मोरगाव, वीर, केतकावळे, नारायणपूर, कानिफनाथ आदी देवस्थानांकडे जाणारी वाहनेही याच मार्गे जात असतात. बारामती, लोणंद, निरा आदी शहरांकडे जाणारी, कामधंद्यानिमित्त दररोज पुणे शहर परिसरात ये-जा करणारी शेकडो वाहने याच मार्गाचा वापर करीत असतात. परंतु घाटाच्या या दुरवस्थेमुळे या सर्व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात या मार्गावर अनेक वेळा वाहने पलटी झाली आहेत. अनेक वाहनांच्या या तटबंदीला धडका बसून ती जागोजागी ढासळली आहे. 

तटबंदी दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

दिवे घाटातील धोकादायक दरडी व तटबंदीमुळे, आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घाटाच्या तटबंदीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वडकीचे माजी उपसरपंच सचिन मोडक व संदीप मोडक यांनी केली आहे.