Mon, Mar 25, 2019 02:52
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › भूतबाधा झाल्याचे सांगत विवाहितेला घरातून हाकलले

भूतबाधा झाल्याचे सांगत विवाहितेला घरातून हाकलले

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी 

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पतीसह सासरच्या मंडळींनी तिला भूतबाधा झाल्याचे सांगत हैदराबाद येथे नेऊन मांत्रिकाकडून तंत्र-मंत्र करत घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत 21 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिचा पती,  सासू, नणंद,  एक महिला व इतर एक अशा पाच जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे 2015 साली लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यात पती व सासू व नणंद यांच्याकडून तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यासोबतच शेजारी राहणारी एक महिला पीडितेच्या पतीकडे सतत येत होती. पतीला तिच्याबद्दल विचारणा केली तेव्हा आमचे प्रेमसंबंध आहेत. तू आमच्या दोघांमध्ये पडायचे नाही असे त्याने पीडितेला सांगितले. त्यानंतर  माहेरहून पाच तोळे सोने व गृहउपयोगी वस्तू आणण्यासाठी वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. तर शेजारी राहणारी महिलाही तक्रारदार विवाहितेला दमबाजी करू लागली. पीडितेने कंटाळून वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतरही त्या त्यांच्यासोबत त्रास सहन करत राहू लागल्या. काही काळानंतर तिला मुलगी झाली म्हणून पुन्हा कुटुंबीयांनी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हैदराबादला लग्नाला जायचे असल्याचे निमित्त करत तिच्या अंगावरील सोने काढून घेतले. तेथेही त्या शेजारच्या महिलेने पीडितेला ‘तुझा पती माझाच आहे. त्यांच्या फंदात पडून नको,’ अशी धमकी दिली. नातेवाईकांकडे गेल्यावर तक्रारदार महिलेला भुतबाधा झाल्याचे सांगत पतीने एका मांत्रिकाला बोलावून घेतले. तिचे हातपाय बांधून मांत्रिकाने मंत्रांचा प्रकार केला. हा प्रकार तक्रारदार महिलेने वडिलांना फोनवरून सांगितला. त्यानंतर तिला पतीसह इतरांनी घरातून हाकलून दिले. याप्रकरणी पीडितेने कोंढवा पोलिसांत यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड हे  करत आहेत.