Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Pune › कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम येणार संपुष्टात

कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम येणार संपुष्टात

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 12:48AMपुणे :  शंकर कवडे

राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी परिषदेमार्फत चालविण्यात येणारा तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जुलै 2017 मध्ये कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या या पदविकेबाबत राज्यातील विद्यापीठांकडे अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यावर चारही कृषी विद्यापीठांनी हा पदविका अभ्यासक्रम रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र कृषी परिषदेकडे केली आहे. दरम्यान, या निर्णयावर परिषदेकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द होणार आहे.

राज्यात कृषी क्षेत्रामध्ये चार कृषी विद्यापीठ व कृषी परिषदेमार्फत मराठी भाषेतून दोन वर्षांचा पदविका तर सेमी इंग्रजी स्वरुपात तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन व चार वर्षांच्या कालावधीत इंग्रजी माध्यमातून कृषी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. जानेवारी महिन्यात शासनाने काढलेल्या निर्णयानुसार कृषी तंत्रनिकेतन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालू ठेवण्याबाबत कृषी विद्यापीठाच्या विद्या परिषदांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विद्यापीठांनी हा पदविका अभ्यासक्रम पूर्णत: रद्द करण्याची शिफारस परिषदेला केली आहे. परिणामी, यावर्षापासून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविल्या जाणार नाहीत. तसेच, यंदा 2018-19 या चालू शैक्षणिक वर्षापासून 3 वर्षाचा कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसर्‍या वर्षात थेट प्रवेश घेता येणार नाही. फक्त 2 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम राज्यभरात सुरू राहील, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

जुलै 2017 मध्ये कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्यानुसार पदवीच्या प्रथम वर्षात केवळ सामाईक प्रवेश परिक्षा (सीईटी) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने राज्यात 2017-18 पासून पाचव्या अधिष्ठाता समितीनुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली. यामुळे कृषी विद्यापीठांच्या मते कृषी तंत्रनिकेतन पदविका पूर्ण केलेले विद्यार्थी हा नवीन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पात्र ठरत नाही. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी याबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे देखील विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.