होमपेज › Pune › रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू

रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

धुलिवंदन व रंगपंचमीला रंग जपून खेळणे आवश्यक  आहे. कारण धुलिवंदनच्या दिवशी भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये कामावर जाणार्‍या एका 31 वर्षीय तरुणाच्या डोळ्यावर रंगाने भरलेला फुगा जोरात येऊन आदळला. जोराचा आघात झाल्याने डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडले होते आणि नेत्रपटलही सरकले होते. त्याला दिसेनासे झाले पण त्यावर तातडीने बिन टाक्याची रेटिनाची शस्त्रक्रिया केल्याने त्याच्या दृष्टीत सुधारणा होऊ लागली आहे. 

संतोष गुरव, वय 31, रा. भोसरी असे त्या तरुणाचे नाव आहे. संतोष दोन मार्चला सकाळी सायकलने कामावर जात होता. वाटेत काही मुले रंग खेळत होती. त्यामुळे मुलांनी त्याला रंग लावण्याचा प्रयत्न केला. सायकलवरून तो खाली उतरल्यानंतर काही जण रंग लावत होते. त्यावेळी अचानक कोठून तरी पाण्याने भरलेला फुगा त्याच्या उजव्या डोळ्यावर आपटला. त्यात त्याचा चष्मा फुटला. डोळे दुखायला लागले. त्यानंतर तो घरी पोहोचला, पण त्याला काहीच दिसत नसल्याचे लक्षात आले.

त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घोले रोडच्या राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) हॉस्पिटलमध्ये आणले. त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडलेले तसेच नेत्रपटल सरकल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली होती. त्याच्यावर नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर व डॉ. अक्षय कोठारी यांनी रेटिनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी डोळ्याच्या आतील बाजूतील जेली कटरच्या सहाय्याने काढून नंतर सिलिकॉन ऑईलचा वापर करून पडदा चिकटविला. त्याला आता पुन्हा थोड्याफार प्रमाणात दृष्टी येण्यास सुरुवात झाली आहे. सहा महिन्यांत त्याला वारंवार तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सहा महिन्यांत त्या तरुणाची दृष्टी सुधारू शकेल, असा विश्वास डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केला. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पन्नास हजार रुपये खर्च आला असून आणखी काही महिन्यांनी तितकाच खर्च येणार आहे. 

पडदे सरकण्याचे रोज दोन रुग्ण

पडदा सरकण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये डोळ्याला मार लागणे, कमी नंबरचा असल्याने आणि अनुवांशिकतेमुळेही डोळ्याचे पडदे सरकू शकतात. या रुग्णाला पाण्याचा फु गा जोरात उजव्या डोळ्याला लागल्याने त्या दाबामुळे त्याचा पडदा सरकला होता. पडदा सरकल्याचे दिवसाला एक-दोन रुग्ण येतात, रंग खेळताना फुगा फेकू न मारू नये, त्यामुळे पुढे मोतीबिंदू, काचबिंदू होण्याची शक्यता असते.    - डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ