Tue, Mar 19, 2019 03:46होमपेज › Pune › पालिकेचे बिगारी ते अधिकारी रस्त्यावर

पालिकेचे बिगारी ते अधिकारी रस्त्यावर

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेची मुख्य सभा आणि महापौैरांच्या आदेशाला हरताळ फासून महापालिका अतिरीक्त आयुक्त आणि उपायुक्त पालिकेच्या कर्मचारी अणि अधिकार्‍यांचा ‘ग्रेड पे’ कपात करण्याची कार्यवाही करत आहेत. खरे तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि त्याच्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना पालिका प्रशासनाकडून अन्यायकारक कृती केली जात आहे. या ‘ग्रेड पे’ कपातीला विरोध दर्शविण्यासाठी पालिकेचे बिगारी ते अधिकारी यांनी एकत्रित येत मंगळवारी महापालिकेसमोर चक्का जाम आंदोलन केले. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ‘ग्रेड पे’ कमी करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

महापालिकेच्या 18 हजार कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा ‘ग्रेड पे’ कपात करण्याचा घाट पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने घातला आहे. सहावा वेतन आयोग देताना पालिकेच्या कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांपेक्षा जास्त ‘ग्रेड पे’ असून तो समान असला पाहिजे, असे सांगितले होते. त्यानुसार ‘ग्रेड पे’ कपात करण्याचे काम सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी महापालिकेचे सर्व विभागांमधील सेवक, कर्मचारी व अधिकार्‍यांनी कामगार नेत्या मुक्ता मनोहर व कॉ. उदय भट यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी सकाळपासूनच पालिका भवनासमोर चक्का जाम आंदोलन सुरू केले. 

तत्पूर्वी बोलताना मुक्ता मनोहर म्हणाल्या, नागरिक किती घाण करतात, याचा विचार न करता आपले सेवक  काम करतात. ओला आणि सुका कचरा एकत्र असल्यास स्वीकारू नये, असा नियम असतानाही आमचे सेवक स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून तो स्वीकारतात. समाजाचे आरोग्य राखणार्‍यांना वेठीस का धरता असा सवाल त्यांनी यावेळी केला. कॉ. उदय भट म्हणाले, पालिका आयुक्तांनी 26 मार्च 2015 रोजी न्यायालयात सांगितले होते, की पुणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा आणि अधिकार्‍यांचा ‘ग्रेड पे’ योग्य आहे. मग आता का ‘ग्रेड पे’ कमी केला जात आहे. 

महापौर टिळक म्हणाल्या, मुख्य सभेचा ठराव खंडित करुन अधिकारी ‘ग्रेड पे’ करण्याचे उद्योग करत आहेत. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ‘ग्रेड पे’ कपात करू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सभागृहनेते भिमाले यांनी शहराची स्वच्छता ठेवणार्‍यांच्या श्रमाचा सन्मान केला जाईल. तसेच कामगारंवर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांना शासनाकडे परत पाठविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.