Thu, Apr 25, 2019 18:53होमपेज › Pune › अवैध धंद्यांच्या पाठबळामुळेच फोफावतेय गुन्हेगारी

अवैध धंद्यांच्या पाठबळामुळेच फोफावतेय गुन्हेगारी

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 11:19PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

देहूरोड परिसरात मोठ्या संख्येने पण लपून छपून सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडून मिळणारे हप्तारूपी पाठबळ हेच गुन्हेगारी वाढण्याचे प्रमुख कारण असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. ‘देहूरोड परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक’ या मथळ्याखाली 19 तारखेला ‘पुढारी’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या चार दिवसांत शेकडो नागरिकांनी आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातुन तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून व्यक्त केले. 

अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट आदेश पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी काढले असताना शहरात लपून छपून सुरू असलेल्या मटका व्यवसायाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. मोबाईल फोनवर याबाबतचे अनेक अ‍ॅप उपलब्ध असून, सोशल मीडियाचा वापर करून तसेच फोनवरून आकडे बुकिंग करून हा व्यवसाय सध्या सुरू आहे. शिवाय खिशात मटक्याच्या चिठ्ठ्या घेऊन फिरणारे अनेक पंटर दिवसाकाठी जोरदार धंदा करत आहेत. सर्वसामान्य माणसाला या प्रकाराची कल्पना असताना पोलिसांना हे प्रकार कळत नाही याबद्दल नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. ‘पुढारी’ने यासंदर्भात 19 तारखेला वृत्त प्रसिध्द केले होते. 

या वृत्तामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या वृत्ताचे समर्थन केले. सोशल मिडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. अगदी आठवी-नववीतील शाळकरी मुले तलवार-कोयता यासारखी हत्यारे घेऊन हाणामार्‍या करतात, यापेक्षा अधिक वाईट प्रकार काय असू शकतो, असा प्रश्‍न उपस्थित करीत विजय जावळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

अधिकारी बदलण्यापेक्षा शहरात मोक्याच्या ठिकाणी पोलिस औटपोस्ट किंवा चौकी उभारून तिथे कायम दोन पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असल्याचे मत सरकारी सेवेत वरिष्ठ अधिकारी असलेले जलील शेख यांनी नोंदविले. 

एखादा गंभीर गुन्हा केला की, अवैध धंदेवाल्यांकडून अशा तरुणांना हप्ताबाजी सुरू होते. हा पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग तरुणांनी अवलंबिला आहे. त्यामुळे अवैध धंदे आणि गुन्हेगारी यांचे अतूट नाते आहे. अवैध धंदे शहरातून हद्दपार केल्यास आपोआपच गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर यांनी व्यक्त केली. धर्मपाल तंतरपाळे, विठ्ठल हिनुकले, संदीप कुर्‍हाडे, सत्यवान गरूड, सूर्यकांत सुर्वे, पोपट कुरणे आदी विविध क्षेत्रातील प्रमुखांसह अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.