Fri, Jul 19, 2019 23:12होमपेज › Pune › खोदाईची परवानगी नसल्याने एमएनजीएलचा वेग मंदावला

खोदाईची परवानगी नसल्याने एमएनजीएलचा वेग मंदावला

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:48AMपुणे : नेहा सराफ 

मागील वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मिळून एमएनजीएल अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे अवघ्या 40 किलोमीटर खोदाई करण्यात आली. त्यामुळे एमएनजीएलचा वेग मंदावला असून, या वर्षी मात्र जोरात काम होण्याची चिन्हे आहेत. 

एमएनजीएलमार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड  महापालिका क्षेत्रात एमएनजीएलमार्फत घरगुती वापरासाठी वायूवाहिनी टाकली जाते आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक घरोघरी वायू वाहिनी पोचवण्याचे एमएनजीएलचे उद्दिष्ट आहे. सध्या शहरातील सुमारे 82 हजार ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, मागील वर्षी पुणे महापालिकेने केवळ 40 किलोमीटर खोदाई करण्यास परवानगी दिल्याने कामाचा वेग कमी झाला आहे.

त्यापूर्वीच्या वर्षी दोन्ही महापालिकांनी खोदाईस आडकाठी न घेतल्याने सुमारे 220 किलोमीटर वायू वाहिन्या टाकण्यात यश आले होते. त्यातही शहरात असणार्‍या बेसाल्ट खडकामुळे खोदाई करणे तितकेसे सोपे नसून दिवसाला फक्त 50 फूट खोदाई करण्यात येते. मात्र, मागील वर्षी परवानगी नसल्याने अनेक भागांत वायू वाहिन्या टाकण्यास विलंब झाला आहे. यंदा महापालिकेकडे 200 किलोमीटर परवानगी मागण्यात आली असून, त्यापैकी 80 किलोमीटरला देण्यातही आली आहे. त्यामुळे आगामी वर्षात पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात मोठी खोदाई होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

खोदाई करताना  पेठ भाग अत्यंत गजबजलेला असल्याने त्या भागात काम  करणे अशक्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे सध्या आंबेगाव, उंड्री, बाणेर, पाषाण येथे काम सुरू आहे. तर, येत्या काही दिवसांत लोहगाव, कसबा, कात्रजचा काही भाग, रावेत येथे काम सुरू होणार आहे. 

समान पाणीपुरवठा योजनेचा परिणाम नाही 

आगामी काळात महापालिका शहरभर जलवाहिन्यांचे जाळे टाकून समान पाणीपुरवठा योजना राबवणार आहे. या वेळी संपूर्ण शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. मात्र,  त्यामुळे एमएनजीएलच्या वायू वाहिन्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वायू वाहिनी जलवाहिनीपेक्षा अधिक खोल असल्यामुळे त्यांची तोडफोड होणार नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला.