Tue, Apr 23, 2019 20:25होमपेज › Pune › परिचारिका कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम

परिचारिका कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:01AMपिंपरी : वर्षा कांबळे 

रुग्णालयातील रुग्णसेवेसाठी देशातील मानवी विकास निर्देशांक उच्च स्थानावर नेणार्‍या आरोग्य निर्देशांक सुधारण्यामध्ये जीएनएम आणि एएनएम परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णालयात चांगली व परिणामकारक रुग्णसेवा देण्यासाठी महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या शिफारशीनुसार परिचारिकांचे प्रमाण 1 :4 असे असणे आवश्यक आहे. सध्या हे प्रमाण 1 : 60 इतके आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. 

भारतीय परिचर्या परिषद व जागतिक आरोग्य संघटनेनुसार आपल्या देशात 19 लाख 40 हजार परिचारिकांची कमतरता आहे. त्यास भरती प्रक्रियेची अनास्था, स्थलांतर, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता आदी कारणे जबाबदार आहेत. देशात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे काम करण्यासाठी 13 हजार परिचारिकांची गरज आहे. खासगी रुग्णालयामध्ये प्रशिक्षित परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. त्यास किमान वेतन कायदा नसल्यामुळे अपुरे वेतन, कामाचे अमर्यादित तास, मानासिक तणाव आदी कारणे आहेत. सध्या बर्‍याच शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिकांची संख्या कमी असल्यामुळे परिचारिकांवर अतिरिक्‍त कामाचा ताण पडत आहे. 

शासकीय रुग्णालयात वरिष्ठ परिचारिकांना प्रतिमहा कमाल वेतन 80 हजार मिळते. तर खाजगी रुग्णालयात परिचारिकांना पाच ते दहा हजार प्रतिमाह वेतन मिळते. भारतीय परिचर्या परिषदेने किमान 20 हजार रुपये प्रतिमाह ही शिफारस केली आहे. याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. भारतीस परिचर्या परिषदेच्या शिफारशीनुसार 50 ते 100 बेडेड खाजगी रुग्णालयात शासकीय वेतनाच्या 25 टक्केपेक्षा कमी तफावत असू नये. तसेच 100 ते 200 बेडेड खासगी रुग्णालयात 10 टक्केपेक्षा कमी तफावत असू नये. आणि 200 पेक्षा जास्त बेडेड रुग्णालयात परिचारिकांना शासकीय वेतनाच्या समान वेतन द्यावे. मात्र, याची अमंलबजावणी खासगी रुग्णालय करीत नाहीत.  तसेच परिचर्या अभ्याक्रमामध्ये क्षमता, कौशल्य, ज्ञान व मानवतावादी मुल्ये यांचा काळानुरुप समावेश करावा तसेच परिचारिकांची अपुरी संख्या पाहता अधिक शासकीय परिचर्या महाविद्यालये स्थापन करण्याची गरज आहे. तसेच परिचारिकांची कंत्राटी पद्धतीवरील भरती रद्द करून स्थायी पदावर भरती करायला हवी.