Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Pune › कुपोषणामुळे बुटकेपणाच्या प्रमाणात वाढ

कुपोषणामुळे बुटकेपणाच्या प्रमाणात वाढ

Published On: Mar 11 2018 1:03AM | Last Updated: Mar 10 2018 11:01PMपिंपरी : पूनम पाटील

वाढती स्पर्धा, सामाजिक व आर्थिक समानतेचा अभाव, नोकरीच्या गडबडीत मुलांकडे होणारे दुर्लक्ष व परिणामतः मुलांचे होणारे कुपोषण यामुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटत आहे; तसेच कुपोषणामुळे मुले विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत असून, त्यातूनच पोषक घटकांची झीज होऊन बुटकेपणाचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. वाढीच्या वयातच मुलांचे कुपोषण होत असल्यामुळे शहरात बुटकेपणाच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे मत सार्वजनिक पोषण व आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

एका सामाजिक संस्थेने केलेल्या अहवालानुसार कुपोषणामुळे पुणे व शहर परिसरात बुटकेपणाचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले आहे. बुटकेपणाचे मुख्य कारण म्हणजे स्तनपानाविषयी गैरसमज व सतत होणारे आजारपण. यात खासकरून सर्दी, ताप, खोकला व जुलाब आणि पाण्यामुळे होणारे आजार. मुख्यतः जुलाबामुळे झिंक हा सूक्ष्म पोषक घटक बाहेर पडतो. यामुळे उंची वाढ कमी होते. यासाठी तीळ, मांसाहार व अंड्यातला पांढरा बलक आहारात घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

जागतिकस्तरावर याबाबत मोठी मोहीम सुरू आहे. गर्भावस्थेतील नऊ महिने; तसेच जन्मानंतरची पहिली दोन वर्षे असे एकूण हजार दिवस हे लहान मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि या हजार दिवसांचा बुटकेपणाशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे हजार दिवसांत योग्य काळजी घेतल्यास बुटकेपणाची समस्या उद्भवणार नाही, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत शहरातील काही सामाजिक संस्था सातत्याने  पाठपुरावा करत असून, कुपोषित बालक व कुटुंबांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी दिली. गरोदरपणात स्त्रियांनी योग्य काळजी घेतल्यास हे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

चुकीच्या आहारपपद्धती

कुपोषणामुळे बुटकेपणा येतो; तसेच बुटकेपणाचा संबंध हा चुकीच्या स्तनपानाच्या पद्धती, चुकीचा पोषक आहार, सातत्याने होणारे जुलाब व आजार यांच्याशी आहे. त्यातल्यात त्यात जुलाबामुळे शरीरातील झिंकचे प्रमाण कमी होते. ती झीज भरून काढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात झिंकच्या गोळ्या उपलब्ध आहेत. खासकरून शासनाच्या उपक्रमांतर्गत जुलाबानंतर पंधरा दिवस झिंकच्या गोळ्या घेतल्यास मुलांची प्रतिकारक्षमता वाढते व उंची कमी होण्याचा धोका कमी होतो.     - डॉ. राम गुडगिला, सार्वजनिक पोषण आहार (आरोग्यतज्ज्ञ)