Tue, Jul 23, 2019 02:32होमपेज › Pune › केंद्राने साठा मर्यादा उठविल्याने साखरेची घसरण थांबणार

केंद्राने साठा मर्यादा उठविल्याने साखरेची घसरण थांबणार

Published On: Dec 21 2017 12:59PM | Last Updated: Dec 21 2017 12:59PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने व्यापार्‍यांवरील साखर साठा व उलाढालीवर मर्यादा उठविण्याचा निर्णय १९ डिसेंबर रोजी घेतला. या निर्णयामुळे साखरेच्या भावात वाढ होणार नसली तरी, सतत होणारी घसरण थांबण्यास मदत होईल. त्यामुळे या निर्णयाचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्वागत केले आहे. केंद्राने साखर उद्योगाच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आभार मानले असून २० लाख टनांचा साखरेचा राखीव साठा करण्यासाठी पावले उचलल्याची मागणीही केलेली आहे. 

केंद्रिय मुख्य साखर संचालकांची भेट वळसे-पाटील आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ७ डिसेंबर रोजी घेतली होती. त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. साखर कारखाने सुरु होताना क्विंटलला ३५०० ते ३६०० रुपयांचा भाव ३१००0 रुपयांपर्यंत खाली आलेली असल्याचे सांगितले. याबाबत ‘पुढारी’बरोबर बोलताना नाईकनवरे म्हणाले की, साखर साठ्याचे बंधन हटविल्याने व्यापार्‍यांकडून अत्यल्प प्रमाणात होणार्‍या साखर खरेदीत आता वाढ होण्याची अपेक्षा आहे. एकीकडे साखर उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. केंद्र व संबंधित राज्य शासनाच्या स्तरावरुन वाढीव ऊस दर जाहीर झाले आहेत. त्यात मागील कर्जफेडीचे हप्ते व थकित व्याज यांचे ओझे कारखान्यांवर आहे. शिवाय कारखान्याचा प्रशासनाचा वाढता खर्च पाहता साखरेची भावपातळी क्विंटलला ३५०० रुपयांवर जाणे क्रमप्राप्त असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. साखरेच्या निर्यातीवर असणारी बंधने व निर्यात कर शिथिल करणे, साखर आयातीवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याची गरज असून तसे झाल्यास साखर उद्योगाची सध्या झालेली आर्थिक कोंडी सुटण्यास मदत होईल. साहजिकच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना समाधानकारक दर देण्यास त्याचा फायदा होईल, असेही वळसे पाटील यांनी सुचविल्याचे त्यांनी सांगितले.

साखरेची भावपातळी स्थिरावणार

याबाबत पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय गुजराथी म्हणाले की, व्यापार्‍यांवर असणारी साठा मर्यादा पाच हजार क्विंटलइतकी होती. एवढा माल व्यापारी वर्ग ठेवत नव्हता. मात्र, चालूवर्षीचा ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यापासून साखरेचे भाव सातत्याने कमी झाले. साखरेच्या भावातील मंदीची ही धारणा केंद्राच्या निर्णयामुळे आता थांबण्यास मदत होवून भावपातळी स्थिरावण्यास मदत होईल. बुधवारी एस् ३० ग्रेड साखरेच्या क्विंटलचा भाव २५ रुपयांनी कमी होऊन ३३७५ ते ३४२५ रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव प्रतिटनास ३६० डॉलरवरुन वाढून ३७७ डॉलरवर पोहोचले आहेत. पाकिस्तानने अनुदान देऊन १५ लाख टन साखर निर्यात करण्याचे घोषित केले आहे. ही साखर भारतात आयात न होण्यासाठी केंद्राने तत्काळ पावले उचलावीत.