Sun, May 19, 2019 21:59होमपेज › Pune › खारघरला सोडण्याच्या बहाण्याने एकास लुबाडले

खारघरला सोडण्याच्या बहाण्याने एकास लुबाडले

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:08AMपुणे : प्रतिनिधी 

खारघर येथे सोडण्याच्या बहाण्याने स्वारगेट येथून खासगी प्रवासी कारमध्ये बसवून चौघांनी एकास पिस्तुलाचा धाक दाखवत लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौघांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्याकडील दागिने, मोबाइल काढून घेत एटीएममधून 41 हजार रुपये काढून कळंबोली येथे सोडून दिले. गिरीश निकम (41, खारघर, मुंबई) असे त्यांचे नाव असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कळंबोली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा शून्य क्रमांकाने दाखल केला आहे. दरम्यान, हा प्रकार स्वारगेट येथे घडला असल्यामुळे तो गुन्हा पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम हे खारघर येथे राहण्यास आहेत. सोमवारी (दि. 16 जुलै) गिरीश वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आले होते. सायंकाळी पुन्हा ते खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आले. रात्री 10च्या सुमारास तेे बसची वाट पाहत असताना एका व्यक्तीने त्यांच्या जवळ येऊन खासगी प्रवासी कार मुंबईला जाणार असून, फक्त एकच जागा शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनीदेखील उशीर होत असल्याने त्या व्यक्तीच्या पांढर्‍या रंगाच्या एक्ससेन्ट कारमध्ये जाऊन बसले. कारमध्ये चालकासह चार जण बसले होते. त्यानंतर ती कार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. त्यानंतर पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर कार चालकाने लंघुशंकेच्या निमित्ताने कार थांबवली.

या वेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीश यांच्या शेजारी बसला. त्याने गिरीश यांच्या कमरेला बंदूक लावून त्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील ऐवज काढून घेतला. निकम यांच्याकडील एटीएम कार्डचा वापर करून तब्बल 41 हजारांची रोकड काढली. त्यानंतर या लुटारूंनी त्यांचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड परत देऊन कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. त्यानंतर गिरीश यांनी डोळ्यावरची पट्टी काढून मोबाइल फोनवरून आपल्या मित्रांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुटारूंनी त्यांच्या मोबाइलमधील दोन्ही सिम कार्ड काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.