Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Pune › गटाराची सफाई न झाल्याने  शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

गटाराची सफाई न झाल्याने  शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटाराची व्यवस्थित सफाई न झाल्याने गुरुवारच्या (दि. 21) पावसाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचून काही भागात अक्षरश: नद्याचे स्वरूप आले होते. गुडघ्यापेक्षा अधिक पाणी असल्याने वाहनचालक व पादचारी काही वेळ अडकून पडले. तसेच, चालक व पादचार्‍यांची मोठी गैरसोय झाली. पहिल्याच पावसात शहराची झालेली ही परिस्थिती पाहून पालिका प्रशासनाचे ‘सफाईकामा’वर शंका उपस्थित केली जात आहे. 

दुपारी तीननंतर शहरातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दोन तासांच्या या पावसात शहरातील सर्वच रस्त्यावर आणि चौकात पाणी सांचून नद्याचे स्वरूप आले होते. काही भागात धबधब्याप्रमाणे वेगात पाणी वाहत होते. त्यामुळे त्या पाण्यातून वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागली. तर, अनेक दुचाक्या पाण्यातून नेल्याने नादुरूस्त झाल्या.पालिकेने रस्त्याच्या कडेला पावसाळी भूमिगत गटारे बांधली आहेत. त्याची नुकतीच सफाई केली गेली आहे. सफाईत या नाल्यातील कचरा व माती झाकण्याच्या बाजूलाच ठेवण्यात आले होते. तसेच, आतील भागातून गटारे स्वच्छ केले गेले नाहीत. अनेक भागात पावसाळी गटारांना ड्रेनेज लाईनचा जोड दिला गेला आहे. तसेच, काही ठिकाणी या गटार्‍यांतील पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नाहीच किंवा ते बंद केले गेले आहेत. 

त्याचबरोबर रस्त्याकडेचे अनेक गटारी पावसाळा येईपर्यंत साफच केली गेली नाहीत. अनेक भागांतील या गटार्‍यामध्ये पाळापाचोळा आणि कचरा कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या प्रकारच्या सफाईकामामुळे पाणी वाहून जाण्यास मार्ग न मिळाल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचून राहिले आणि त्याला नद्याचे स्वरूप आले. परिणामी, नागरिक व वाहनचालकांची गैरसोय झाली. पाणी साचण्याचा असंख्य तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या. पालिकेचे अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी उपसा करून पाण्यास वाट करून दिली.  शहरातील काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, थेरगाव, आकुर्डी, निगडी, डांगे चौक, पिंपळे गुरव, सागंवी, भोसरी आदी परिसरात तसेच दापोडी ते निगडी ग्रेडसेपरेटरमधील अनेक ठिकाणासह शहराती अनेक भागांत रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचल होते. तसेच, काळेवाडी, आकुडी, कासारवाडी, दापोडी आदी भागांतील काही घरांमध्ये आणि सोसायट्यांत पाणी शिरले. सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आपआपल्या भागात नाले सफाई केली गेली आहे. सर्व भागांत 90 टक्केपर्यंत नाले सफाई झाली आहे. नाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचा प्रश्‍न नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

काळेवाडीतील जय मल्हारनगरमध्ये 45 घरांत पाणी

पालिकेने रस्ते काम करताना पूर्वीचा रस्ता खोदून न काढता त्यावरच खड्डी व डांबराचा स्तर चढविला जातो. त्यामुळे शहरातील अनेक गावठाण परिसरात आणि रस्त्याकडेचे घरे व दुकाने रस्त्यांच्या पातळीपेक्षा खाली गेले आहे. त्यामुळे त्या भागातील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरते. असाच प्रकार काळेवाडीतील जय मल्हारनगर येथे आज घडला. तेथील सुमारे 45 घरांमध्ये पाणी शिरले. तेथे गुडघ्यापेक्षा जास्त उंचीने पाणी साचले होते. तेथून पाणी हटविण्याचे काम अग्निशामक दलाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या ठिकाणी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्यासह स्थानिक अधिकार्‍यांनी भेट देऊन  तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना पथकास दिल्या.