Sun, Aug 25, 2019 23:42होमपेज › Pune › खोदाई अधिकच्या दरामुळे पिंपरीवासीय गॅस जोडणीपासून वंचित

खोदाई अधिकच्या दरामुळे पिंपरीवासीय गॅस जोडणीपासून वंचित

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:24AMपुणे : नरेंद्र साठे

महाराष्ट्र नॅचरल गॅॅस लि. कंपनीच्या (एमएनजीएल) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या गावांमध्ये घरगुती गॅस जोडणी दिली जाते. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करताना पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खोदाईचे दर पाच पटपेक्षा अधिक असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत खोदाईचे दर अधिक असल्याने गॅस जोडणी देण्यासाठी विलंब होत असल्याचे एमएनजीएलचे म्हणणे आहे.

एमएनजीएलच्या पाईप लाईनसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका एक मीटर रस्ता खोदाईसाठी सुमारे साडेसोळा हजार रुपयांपर्यंत दर आकारते, तर दुसर्‍या बाजूला पुणे महापालिका एमएनजीएलसाठी हाच दर तीन हजार रुपयापयर्र्ंत घेते. ‘श्रीमंत’ महापालिकेच्या जास्तीच्या दरामुळे एमएनजीएलचे गॅस कनेक्शन पुण्याच्या तुलनेत कमी आहेत. घरगुती गॅस वापरासाठी एमएनजीएल पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन देते. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सिलिंडरपेक्षा अधिक सोयीस्कर असलेल्या या सुविधेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. एमएनजीएलच्या पाईपलाईन टाकण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींची असलेली लुुडबूड हा मुद्दा आहेच. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याच्या धोरणाचा फटका बसत आहे.

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील दर कमी करावेत, यासाठी एमएनजीएलच्या अधिकार्‍यांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेपुढे हा विषय ठेवण्यात आला होता. परंतु, सभेत हा विषय फेटाळण्यात आला. त्या कारणाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दर सर्वांपेक्षा जास्त राहिले. परिणामी नागरिकांना गॅस जोडणी मिळण्यापासून लांबच राहावे लागले. एमएनजीएलच्या पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते रहाटणी चौकापर्यंत 18 मीटर डांबरी रस्ता खोदाईसाठी 2 लाख 93 हजार 994 रुपये जमा करण्यास सांगितले असून, त्यानंतरच खोदाईची परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक ठिकाणच्या रस्त्यानुसार हे दर कमी-अधिक आहेत.

 

Tags : Pune, Pune News, Pimpri gas connection, excavation,high rates,