Thu, Mar 21, 2019 11:29होमपेज › Pune › भ्रष्टाचाराच्या टीकेमुळेभाजप ‘बॅकफूट’वर

भ्रष्टाचाराच्या टीकेमुळेभाजप ‘बॅकफूट’वर

Published On: Jan 23 2018 8:50AM | Last Updated: Jan 23 2018 8:50AMपिंपरी-चिंचवड : जयंत जाधव

कामातील 12 ठेकेदारांना दोन वर्षांपूर्वी दिलेल्या 589 कोटींच्या कामात राष्ट्रवादीने जवळपास 96 कोटी रुपये वाचविल्याचे कागदपत्रांद्वारे सिद्ध करण्यात आले, तर 425 कोटींच्या कामात 90 ते 100 कोटींची बचत अपेक्षित असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 30 कोटींची बचत केल्याचा दावा हास्यास्पद आहे. या कामात 90 ते 95 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेना व राष्ट्रवादीने केलेला आरोप गंभीर आहे, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यास पदाधिकार्‍यांवर कारवाई करू, अशी केलेली घोषणा आता प्रत्यक्षात उतरणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील दोन वर्षांच्या विकासकामांचे लेखाशीर्ष निर्माण करून आताच स्थायी समिती एवढ्या घाईने कोट्यवधी रुपयांची कामे वर्गीकरण करून ऐनवेळी विषय मंजूर का करीत आहे? या मागेही निवडणुकांचा खर्च काढण्याचा भाजपचा डाव तर नाही ना, असा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे. ‘ना भय ना भ्रष्टाचार’ व पारदर्शक कारभार करून शहरात विकासाची गंगा आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत केली होती. त्यानुसार नागरिकांनी भाजपला भरघोस मते देऊन एकहाती सत्ताही दिली मात्र; एका वर्षातच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाजपने राष्ट्रवादीपेक्षाही
कहर केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते खा. शिवाजीराव आढळराव-पाटील, खा. श्रीरंग बारणे, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे व शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका
सुलभा उबाळे आदी नेत्यांनी मागील शनिवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी भाजपवर आक्रमक टीका केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते
योगेश बहल, प्रवक्ते प्रशांत शितोळे, नगरसेवक दत्ता साने, नाना काटे आदी नेत्यांनी शनिवार, दि. 20 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन भाजपला 425 कोटींच्या ‘रिंग’ मध्ये सुमारे 90 ते 95 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुराव्यानिशी केला. दरम्यान, शहरातील सर्व पक्ष व सामाजिक संघटनांनी शनिवार, दि. 20 जानेवारीला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून भाजपाला निवडणुकीत दिलेल्या अश्‍वासनांचा विसर पडल्याचे स्मरण करून दिले. शहराच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सर्वपक्षीय आंदोलन झाले.त्यामुळेच भाजप शहरात दिवसेंदिवस ‘बॅकफुट’वर जाऊन सत्ता चालविण्यास सक्षम नसल्याचे सिद्ध होत आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांनीच काही महिन्यांपूर्वी जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर महापालिकेत व शहर भाजपची कामाची पद्धत योग्य नाही. सहा महिन्यांत पूर्वी राष्ट्रवादीचीच सत्ता बरी होती, असे का वाटते, असा खोचक सवाल केला होता; तसेच सत्ता कोणा एकामुळे नाही, पक्षामुळे आहे, हे लक्षात ठेवा, असाही शालजोडीतील जोडा मारला होता.
त्यामुळेच शहरातही भाजपकडून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी व संपूर्ण शास्तीकर माफ करण्यात आलेले अपयश, ‘रिंग रोड’ रद्द करण्यात दाखविलेली दिरंगाई या गोष्टींमुळे लोक नाराज आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करताना हरकती, सूचना मागवून सुनावणी न करता जारी केलेल्या अध्यादेशामुळे किचकट व अर्थिक भुर्दंड देणारा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे तीन महिन्यांत केवळ सातच प्रकरणे महापालिकेत नियमितीकरणासाठी दाखल आहेत. जाहीरनाम्यात दिलेली आश्‍वासने विसरल्याने हा उद्रेक होत आहे, याची भाजपाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

चहापेक्षा किटली गरम...!
महापालिकेतील 425 कोटींच्या ‘रिंग’मधील भ्रष्टाचारांचे आरोप, संघटनात्मक काम याच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील पदाधिकारी व पक्षाची कोअर कमिटीची बैठक आता 26 जानेवारीला होणार आहे. भाजपच्या जुन्या पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना एखादा एकनाथ पवारांसारखा अपवाद वगळता सत्तेपासून बाजूला ठेवले आहे. नव्याने पक्षात आलेल्यांच्या हातात सत्ता आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचेही जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष नाही. कार्यकर्त्यांना पदे मिळालेली नाहीत. कार्यकर्तेही पाठ फिरवू लागले आहेत. सत्तेपुढे भाजप पक्ष थिटा झाला आहे. पिंपरीत मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजनाला अवघे 40-50 लोक होते. शहराध्यक्ष आ. जगताप यांच्या आजूबाजूला असलेल्यांचाच महापालिकेत व पक्षात रुबाब आहे, अशी जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांची खंत आहे.

पुढील स्थायी समिती अध्यक्ष चहा, बिस्किटांपुरतेच...! 

महापालिकेतील भाजपचा ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी होल्डर’ व लेखापाल राजेश लांडे यांनी पुढील दोन वर्षांच्या अर्थसंकल्पाची वाट लावली आहे. विकासकामांची आकडेवारी पाहिली,  तर तरतूद नसतानाही त्या त्या परिसरात इतर कामे 2 वर्षे होणारच नाहीत व पुढचे भाजपचे पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष व अन्य समित्यांचे अध्यक्ष यांना फक्त सभेतील चहा, बिस्किटांपुरतेच मर्यादित ठेवण्याची तरतूद योग्यरीतीने तज्ज्ञ अशा या कार्यकर्त्याने स्थायी समिती अध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या दबावामुळे योग्यरीतीने केली आहे. या दोन वर्षांचा आर्थिक फायदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच हातात पडावा म्हणून लाटेवरचे लुटारू शहराला लुटून खात आहेत. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन 77 पैकी 15 नगरसेवकांनाच मालामाल करण्याची योजना यशस्वी करण्याकडे जोर असल्याची टीका प्रशांत शितोळे यांनी केली.