Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Pune › संघटित भिक्षेकर्‍यांमुळे वाहनचालक त्रस्त

संघटित भिक्षेकर्‍यांमुळे वाहनचालक त्रस्त

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:57AMअमोल येलमार

अहिल्यादेवी चौक (मोरवाडी), चिंचवड स्टेशन, निगडीतील टिळक चौक, रहाटणीमधील कोकणे चौक ते जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर, पिंपरी, चिंचवड, डांगे चौक, हिंजवडीमधील सिग्नलला सध्या भिकार्‍यांच्या टोळक्यांमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. पुणे किंवा पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील भिकार्‍यांची एक ‘लिंक’ असल्याचे बोलले जाते. या लोकांकडे असलेली मुले नेमकी कोणाची असा प्रश्नदेखील सिग्नलच्या दीड-दोन मिनिटांत अनेक वाहनचालकांच्या मनाला शिवून जातो. परंतु याच चौकांतून दिवसातून किमान तीन ते चार वेळेस प्रवास करणार्‍या कोणत्याही पोलिस अधिकार्‍याला याबाबत काहीच सोयरसुतक नाही. बेपत्ता होणारी मुले आणि रस्त्यावर भिकार्‍यांकडील मुले यांची साधी चौकशीचे कष्टदेखील पोलिस घेत नाहीत.  दैनंदिन कामकाज व्यस्त असलेल्या पोलिसांकडून भिकार्‍यांवर कारवाई होताना दिसत नाही.

अनेक चौकांचे परिसर भिकार्‍यांनी व्यापललेले आहेत. त्यांची अनेक कुटुंबे उड्डाणपुलाखालीच आपला संसार थाटून बसली आहेत. राज्यातील उड्डाणपुलांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही पुलाखाली पार्किंग अथवा फिरस्त्यांच्या झोपड्या नकोत, असे आदेश मुंबई उच्च  न्यायालयाने दिले आहेत; मात्र पोलिसांकडून न्यायालयाच्या या आदेशाकडे  दुर्लक्ष केले जात आहे.पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख 10 सिग्नलवर किमान 200 भिकार्‍यांकडून दररोज पैसे गोळा केले जातात. या पैशांचे पुढे काय होते? भिकार्‍यांच्या उदरनिर्वाहापुरतेच हे पैसे राहतात की ते पुढे अन्य कोणाकडे दिले जातात, याबाबत अनेकदा उलटसुलट चर्चा रंगलेल्या असतात. चौकांमधील सीसीटीव्हीत  या लोकांना दररोज सकाळी आणि रात्री कोणत्या वाहनांमधून अन्न आणून दिले जाते हे रेकॉर्ड होते. ज्या वाहनांमधून या भिकार्‍यांना जेवण आणून दिले जाते, ती वाहने कोणत्याही सामाजिक संस्था किंवा संघटनांची नसून, ठरावीक लोकांचीच असल्याचे याच चौकातील हॉटेल व्यावसायिकांकडून अनेकांना वाहतूक पोलिसांना सांगण्यात आले आहे; मात्र शहरातील घडणार्‍या गुन्हेगारी घटना आणि या लोकांचा काही संबंध असेल असेही पोलिसांना वाटत नाही. त्यामुळे सध्या सिग्नलवर चालणार्‍या या नव्या उद्योगाबाबत ‘ना दाद, ना फिर्याद’ अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच या लोकांची चौकशी करून, या संघटित टोळक्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.