Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Pune › रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कॅब सेवा तेजीत

रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कॅब सेवा तेजीत

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:01AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे/नरेंद्र साठे

ठिकाण शिवाजीनगर बस स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँड...दुपारचे अडीच वाजलेले...उन्हाच्या कडक्यात दोन कुटुंब रिक्षा शोधत बसस्थाकातून बाहेर येतात...हिंगणे खुर्दला येता का काका, म्हणून रिक्षाचालकाला विचारतात. रिक्षा चालक उत्तर देतो साडेचारशे रुपये होतील, अन्यथा मीटरपेक्षा चाळीस रूपये जास्त घेईन. दुसर्‍या रिक्षा चालकाला ते कुटुंब विचारतात तर सरळ ऐवढ्या लांब येणार नसल्याचे उत्तर मिळते. रिक्षा चालकांकडून नेहमीच असे अडवणुकीचे प्रकार घडत आहेत. रिक्षा चालकांच्या या अडवणुकीमुळे प्रवासी सरळ खासगी कंपन्यांच्या कॅब बुक करून इच्छितस्थळी जाण्यास पसंती देत असल्याचे दैनिक ‘पुढारी’ च्या पाहणीत आढळून आले आहे.

पुण्यात रिक्षा चालक म्हटल्यानंतर नम्र आणि प्रवाशांना सहकार्य करणारा चालक डोळ्यासमोर येत असे. रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाच्या अनेक बातम्या देखील अधुन-मधून छापून येतात. त्यामुळे रिक्षा चालकांवर प्रवाशांचा विश्‍वास दृढ होत गेला. अद्यापही काही रिक्षा चालक त्यांचा व्यवसाय इमाने इतबारे करत आहेत. त्यामुळेच अनेक प्रवांशाचा कल रिक्षानेच प्रवास करण्याकडे असतो; परंतु पुण्यातील रिक्षा चालक काही वर्षांपासून भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे न येता अव्वाच्या सव्वा रक्‍कम सांगणे, उर्मट वागणुक यामुळे त्यांच्याच व्यवसायावर बालंट ओढवून घेत आहेत. रिक्षा चालकांच्या अरेरावी आणि मनमानीला अनेक प्रवासी कंटाळल्याने, खासगी कंपन्याकडून मिळणार्‍या जलद आणि तुलनेने आरामदायी सुविधांकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे.

शिवाजीनगरप्रमाणेच पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस स्थानक येथे देखील प्रवाशांना रिक्षा चालकांकडून अशाच प्रकारचे अनुभव येत आहेत. शिवाजीनगरहून सांगवीला येणार का, असे विचारल्यानंतर सांगवीतील लोकल प्रवासी वाहतूकीचे कारण देऊन, अव्वाचे सव्वा भाडे सांगण्यात येते. शहरामध्ये अनोळखी व्यक्ती आल्यानंतर तर त्याला रिक्षा चालकांचे वाईट अनुभव येतात. याला काही सन्माननीय रिक्षा चालक अपवादही आहेत. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार तर नेहमीच होतात. पण आता लांबच्या भाड्याला देखील मीटरप्रमाणे येण्यास नकार दिला जातो किंवा मीटरपेक्षा वीस ते चाळीस रूपये जास्त देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते. रिक्षा चालकांच्या या मनमानीला रिक्षा संघटनाकडून जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी प्रवाशी करत आहेत.

 

Tags : pune, pune news, cab service, autorickshaw drivers,