Thu, Apr 25, 2019 23:46होमपेज › Pune › नोडल ऑफिसरला रक्‍कम परत करण्याचे ग्राहक मंचाचे आदेश 

भीम अ‍ॅपमधील त्रुटीमुळे बँकेत दहा हजार जमा झालेच नाहीत

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी 

कॉर्पोरेशन बँकेतून आयडीबीआय बँकेत दहा हजार रुपये वर्ग करूनही जमा न झाल्यामुळे ग्राहक मंचाकडे दावा दाखल केलेल्या तक्रारदाराला मंचाने दिलासा दिला आहे. भीम अ‍ॅपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण मंचाने नोंदवून अ‍ॅपची जबाबदारी असलेल्या नोडल ऑफिसरला तक्रारदाराला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के . वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांच्या मंचाने हा आदेश दिला आहे.  

शिरूर येथील प्रीतम प्रकाशनगरमधील छोटेलाल प्रसाद यांनी नोडल ऑफिसर, भीम अ‍ॅप, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा, कॉर्पोरेशन बँक घोडनदी शाखा, शिरूर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. 

तक्रारदाराने भीम अ‍ॅपद्वारे या बँकेच्या शिरुरमधील खात्यातून दहा हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यात 7 ऑगस्ट 2017 रोजी वर्ग केले होते. तक्रारदाराला त्याबाबतची रिसीट भीम अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळाली होती. परंतु, आयडीबीआय बँकेच्या खात्यात दहा हजार रुपये जमाच झाले नाही. कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आल्याचे दाखविण्यात येत असले तरी ती रक्कम दुसर्‍या खात्यात जमा झालेली नव्हती. 

चौकशी केल्यावर आयडीबीआय बँकेने तक्रारदाराला एसएमएस पाठविला. तक्रारदाराच्या खात्यासाठी त्या बँकेत युपीआय सर्व्हिसची (युनिफाइड पेमेंट सर्व्हिस) परवानगी देण्यात आलेली नाही, असे आयडीबीआय बँकेने कळविले. त्यानंतर तक्रारदार परत कॉर्पोरेशन बँकेकडे गेले. त्यांना पाठविण्यात आलेल्या एसएमएसमध्ये दहा हजार रुपये तक्रारदाराच्या एसबीआय बँकेच्या खात्यात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तक्रारदारानुसार त्यांच्या एसबीआयच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाल्याची नोंदच नव्हती. याप्रकरणी कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारदाराने नोटीस पाठविली. भीम अ‍ॅपच्या नोडल ऑफिसरतर्फे सादर करण्यात आलेल्या लेखी जबाबात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टिम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बँकेकडून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. तक्रारदाराने युपीआयडी ऑप्शन वापरण्याऐवजी मोबाइल नंबर किंवा अकाऊंट नंबर जो एसबीआयला लिंक करण्यात आला होता, तो वापरला त्यावर पैसे जमा करण्यात आले. तक्रारदाराने एसबीआय बँकेचा पर्याय निवडला म्हणून त्यावर पैसे जमा झाले. भीम अ‍ॅप जबाबदार नाही, असे उत्तर दिले.  दोनी बाजूंचा युक्‍तीवाद ऐकल्यानंतर मंचाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल दिला. 

भीम अ‍ॅप हे सर्व्हिस देणारे आहेत हे त्यांनी लेखी जबाबात मान्य केले. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होतात. रक्कम कोठे गेली हे सांगण्यातच आले नाही. यावरुन लक्षात येते की या अ‍ॅपमध्ये त्रुटी आहे. तक्रारदाराच्या कॉर्पोरेशन बँकेतून दहा हजार रुपये वजा करण्यात आले. मात्र ते इतर कोणत्याही बँकेत जमा करण्यात आले नाही ही त्रुटी आहे. यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र असल्याचा निर्वाळा मंचाने दिला.