होमपेज › Pune › न्यायालयाचा आदेश डावलून किरकोळ विक्री जोमात

न्यायालयाचा आदेश डावलून किरकोळ विक्री जोमात

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:32AMपुणे : शंकर कवडे

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक भुसार विभागात किरकोळ विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने देऊनही यार्डात किरकोळ विक्री जोमात सुरू आहे. साधारण तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन भुसार बाजारातील व्यापार्‍यांसह बाजार समिती प्रशासनातील अधिकारी करीत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या प्रशासकांकडून किरकोळ विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. मात्र, तरीही विक्री सुरू आहे.

भुसार बाजारात जवळपास 600 गाळे आहेत. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तेल, कडधान्ये गूळ आदी खाद्यपदार्थांचा व्यापार करण्यात येतो. त्यामार्फत बाजार समिती प्रशासनाला दरवर्षी साधारण 20 कोटी रुपये सेस स्वरुपात जमा होतात. घाऊक विक्रेत्यांकडून गहू, तांदूळ, खाद्यतेलासह अन्य वस्तू खरेदी करून भुसार विभागात किरकोळ विक्री करण्याचा प्रकार नवीन नाही. हा प्रकार वाढल्याने घाऊकऐवजी किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय जोमाने सुरू झाला आहे. बाजार समिती अधिनियम कायद्यान्वये बाजाराच्या आवारात शेतमालाव्यतिरिक्त अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करता येत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तर, गेल्या काही वर्षांपूर्वी भुसार विभागात किरकोळविक्रीविरोधात किरकोळ आणि घाऊक विक्रेते यांच्यात जुंपली होती. यापार्श्‍वभूमीवर बाजार समित्यांमध्ये किरकोळ विक्री बंद करण्याचा आदेश तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी काढला होता. त्यानंतर याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन बाजार समिती प्रशासनाने भुसार विभागात दिलेले 83 किरकोळ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले होते. त्यांच्या परवान्याचे रूपांतरण घाऊक परवान्यात करण्यात आले होते. त्यावेळी दि पुना मर्चंट्स चेंबरने यामध्ये लक्ष घालत हा प्रश्‍न तत्कालीन पणन मंत्र्याकडे गेला होता. पणन मंत्र्यांनीही किरकोळ परवाने रद्द करण्याचा आदेश कायम ठेवल्यानंतर घाऊक व्यापार्‍यांपैकी काही व्यापार्‍यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

किरकोळ विक्री ही बाजाराची गरज असल्याचे म्हणणे दि पूना मर्चंंटस् चेंबरतर्फे बाजारात मांडण्यात आले होते. परंतु, बाजार समिती आवारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतरही किरकोळ विक्री होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. बाजार समिती प्रशासनानेही अशा प्रकारे विक्री करणार्‍यांवर कारवाई केली आहे. तरीही इथे चोरून विक्री सुरूच आहे. दहा वर्षांपूर्वी 3 ते 4 किरकोळ विक्रीची दुकानांची संख्या 70 ते 75 पर्यंत पोहोचल्याने पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी भुसारासह फळभाज्या आणि फळांमधील किरकोळ विक्री करणार्‍या सुमारे 150 किरकोळ विक्रेत्यांचे परवाने नुतनीकरणासाठी बाजार समितीकडे आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत यंदा किरकोळ विक्री करणार्‍या व्यापार्‍यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले नाही. 

किरकोळ विक्रीला अभय? 

मार्केट यार्डातील भुसार विभागात व्यापारी, बाजार घटकांसाठी बी. जे. देशमुख यांनी सचिवपदाचा भार स्वीकारल्यानंतर बाजार घटकांशी चर्चा करून नवीन नियमावली तयार केली होती. अंमलबजावणी दरम्यान नवीन नियमावलीची पत्रके बाजार समितीकडून काढण्यात आली आहेत. मात्र, या नियमावलीमध्ये किरकोळ विक्री करणार्‍यांवर काय कारवाई करणार, याचा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भुसार विभागात किरकोळ विक्री करणार्‍यांना बाजार समितीने अभय दिले आहे का, अशी चर्चा होत आहे.