Fri, May 24, 2019 06:32होमपेज › Pune › वाहनांवरील ’फॅन्सी’ क्रमांकामुळे चोरटे मोकाट

वाहनांवरील ’फॅन्सी’ क्रमांकामुळे चोरटे मोकाट

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 12:33AMमुंढवा : नितीन वाबळे

वाहनांची नंबरप्लेट फॅन्सी, बनावट क्रमांक आणि पुसट किंवा अर्धवट असल्याने वाचता येत नाही. अशा प्रकारच्या वाहनांचाच सोनसाखळी चोर वापर करीत आहेत. अशा प्रकारच्या वाहनाची धडक लागली किंवा अपघात होऊन एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाली, तर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्या वाहनाचा क्रमांकही घेता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनेक वाहनांवर आरटीओने मंजूर केलेले क्रमांक दिसत नाहीत. फॅन्सी क्रमांक वाचता येत नाहीत. बनावट क्रमांकाच्या वाहनाने अपघात झाला, तर ती वाहने आणि चालक बिनबोभाट निघून जातात. पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी कोणी गेले, तर वाहनाचा क्रमांक मागितला जातो. क्रमांक घेता न आल्याने तो देता येत नाही. त्यामुळे अपघाताचा तपास करण्यासाठी वाहन क्रमांक किंवा संबंधित व्यक्तीची ओळख नसल्याने तपासामध्ये अडथळे येत आहेत.

मुंढवा, घोरपडी, बी. टी. कवडे रस्ता, हडपसर औद्योगिक वसाहत, रामटेकडी, मगरपट्टा या परिसरात आयटी कंपन्यांसह इतरही कंपन्या आहेत. त्यामुळे कामगारवर्गही मोठ्या संख्येने आहेत. अनेक कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची वाहने प्रमुख रस्त्याच्या बाजूलाच उभी केलेली असतात. येथून बनावट चावीचा वापर करून चोरट्यांनी अनेक वाहने चोरून नेली आहेत. त्या वाहनांचा क्रमांक बदलून बनावट क्रमांक टाकून ती वाहने वापरली जात आहेत. वाहनांवर क्रमांक असतो मात्र तो बनावट असल्याने तपास लवकर लागत नाही.

चोरीच्या दुचाकींवर चारचाकीचा किंवा जुन्या वाहनांचा क्रमांक टाकला जातो. चाणाक्ष वाहतूक पोलीस अशा प्रकारची वाहने पकडतात. मात्र ती संख्या नगन्य आहे. दररोज वाहनचोरीच्या घटना घडत आहेत. अनेक वाहने पोलिसांनी पकडली आहेत. मात्र, न्यायालयीन प्रकियेमुळे संबंधितांना देत नसल्याने ती वाहने पोलीस स्टेशनच्या बाहेर धूळखात पडली आहेत. त्यातील अनेक वाहने गंजून भंगार झाल्याने निरूपयोगी झाली आहेत.

फॅन्सी क्रमांकाचा फंडा...

निवडणुकांच्या काळात नवीन वाहने बिगर क्रमांकाची वापरण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. त्याचबरोबर अनेक वाहनचालक दादा, मामा, काका, भाऊ, साहेब अशा नावांचा क्रमांकामध्ये वापर केल्याचे चित्र दिसत आहेत. अशा प्रकारची वाहने सुसाट चालविली जात असल्याने अपघात होतात. मात्र, अशा वाहनांचा क्रमांक वाचता येत नाहीत.