Wed, Mar 20, 2019 08:44होमपेज › Pune › पावसाळी पर्यटनात खाद्यपदार्थांची चव न्यारी

पावसाळी पर्यटनात खाद्यपदार्थांची चव न्यारी

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:17PMपुणे : प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन होऊनही रुसलेल्या पावसास सुरवात होत असून, पावसाळी पर्यटनासाठी खडकवासला, पानशेत धरण परिसर, लोणावळा, खंडाळा तसेच सिंहगडाकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम कणीस, उकडलेल्या शेंगा, कांदा भजीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी येथील हातगाड्या तसेच स्टॉलवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. याखेरीज, उकडलेल्या कणसांच्या दाण्यांची भेळ खाण्यासह मटक्यातील चहाचा मोहही अनेकांना होत आहे. 

पावसाळ्याचे वेध लागताच दरवर्षी विविध पर्यटन स्थळांसह शहारातील विविध ठिकाणी पावसात मनसोक्त भिजून पावसाचा आनंद घेण्यात पुणेकर आघाडीवर असतात. याखेरीज, पुण्या-मुंबईसह विविध राज्यातील पर्यटकही लोणावळा, खंडाळा भागात हजेरी लावताना दिसतात. पावसात मनसोक्त भिजल्यानंतर भूक भागविण्यासाठी पर्यटकांकडून कणीस, शेंगा, चहा तसेच कांदा भजीला प्रथम प्राधान्य दिले जाते. यासाठी, विक्रेत्यांकडून जागोजागी स्टॉल तसेच हातगाड्या उभारून त्याची पदार्थांची विक्री करताना दिसतात. शहरासह खडकवासला धरण, लोणावळा, खंडाळा परिसरात यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. भाजलेल्या मका कणसासह, उकडलेली कणसे तसेच कॉर्न भेळलाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. साध्या चहापासून स्पेशल, मटका चहा याखेरीज तंदूर चहाचीही पर्यटकांकडून मागणी होत आहे. 

सध्यस्थितीत गुलटेकडी मार्केटयार्डात दररोज नाशिक, खेड, नारायणगाव परिसरातून चारशे ते पाचशे पोती कणीस, जिल्ह्याच्या विविध भागातून 300 ते 325 गोणी भुईमूग शेंगा तर  70 ते 75 ट्रक कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. घाऊक बाजारात प्रति दहाकिलोस कणसाला 80 ते 140, भुईमूग शेंग 250 ते 300 रुपये तर कांद्याला दर 90 ते 120 मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाचे वेध लागताच शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील विक्रेत्यांकडून कणीस, कांदा, भुईमूगाला मागणी वाढली आहे. पावसाने जोर धरल्यास राज्यासह पुणे विभागातून कणसासह भुईमूग शेंगाची आवक वाढून मागणीही वाढेल अशी माहिती व्यापार्‍यांनी दिली.