Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Pune › दारूच्या नशेत मारहाण केल्याने ज्येष्ठाचा मृत्यू; तरूणाला अटक

दारूच्या नशेत मारहाण केल्याने ज्येष्ठाचा मृत्यू; तरूणाला अटक

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:51AM

बुकमार्क करा
पुणे/येरवडा : प्रतिनिधी 

दोन तरुणांनी दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नरेशदास दादीबा गुप्ता (वय 75, रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) असे मृताचे नाव आहे. मनोज रवी साळवी ऊर्फ चोरमन्या (वय 26, रा. ओव्हाळ वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.  तर अन्य एक आरोपी फरार आहे.  या प्रकरणी इंदूबाई गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे. 

चोरमन्या हा त्याचा मित्र शहाण्या याच्यासह दारूच्या नशेत रविवारी (दि. 6) रात्री अकाराच्या सुमारास गुप्ता यांच्या घरात घुसले. गुप्ता यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना दोघांनी लाकडाने व प्लास्टिकच्या पाइपने जबर मारहाण केली. त्यानंतर ते दोघेही फरार झाले.  गुप्ता यांना गंभीर जखमी अवस्थेत  उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.

गुप्ता यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्याच्या कलमात वाढ होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाईक-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांचा शोध घेऊन चोरमन्या याला थेऊर फाट्याजवळ नायगाव येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकीदेखील हस्तगत केली. चोरमन्यावर वर चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अन्य एक आरोपी शहाण्या हा फरार आहे.  तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत.