Wed, Mar 20, 2019 08:46होमपेज › Pune › मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांवर आता ड्रोनची नजर...!

मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांवर आता ड्रोनची नजर...!

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 12:55AMपुणे : अक्षय फाटक 

कारागृहाच्या आत नुकत्याच घडलेल्या हाणामारीच्या आणि इतर गंभीर घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आणि अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने राज्यातील सेेंट्रल (मध्यवर्ती) जेल परिसरावर आता ड्रोन कॅमेर्‍यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. कैदी आणि कारागृहाच्या आतील हालचालींवर या माध्यमातून कारागृह विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात नुकतीच ड्रोन क ॅमेर्‍याची यशस्वी चाचणी झाली असून, काही दिवसांत राज्यातील येरवडा, कोल्हापूर, औरंगाबादसह दहा मध्यवर्ती कारागृहांत ड्रोन कॅमेर्‍यांची यंत्रणा कार्यरत होईल, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. दिवसातून दोन ते तीन वेळा हे ड्रोन अचानक फिरवून हालचाली टिपल्या जातील. यामुळे कैद्यांमध्ये होणार्‍या मारहाणीच्या घटनांसोबतच बेकायदेशीर कृत्य रोखण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. शिवाय कारागृहांची सुरक्षाही मजबूत होणार आहे, असे या सूत्राने सांगितले.

राज्यातील कारागृहांमध्ये मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगार, दहशतवादी, नक्षलवादी, टोळी सदस्यांचाही यात समावेश आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे दिवसेंदिवस कारागृहात कैद्यांची संख्या वाढत आहे, याचा प्रचंड ताण कारागृह यंत्रणेवर पडत आहे. राज्य कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून तंत्रज्ञानाचा आधार घेत, कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे विविध उपक्रम राबवून व सुविधा उपलब्ध करून देत सुरक्षा यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

कारागृहातील शिस्तबद्ध वातावरण गुन्हेगारांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांना धमकी देऊन, त्यांच्यावर हल्ले केले जातात. येरवडा कारागृहाबाहेर नुकतीच अधिकार्‍यावर गोळीबाराची घटना घडली. कैद्यांमधील भांडणे; तसेच खुनाचे प्रकारही कारागृहांमध्ये घडले आहेत. अवैध गोष्टी कारागृहासाठी नवीन नाहीत. कैद्यांकडे मोबाईल, तंबाखू अशा अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. हे सर्व प्रकार काही कर्मचार्‍यांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. अपुरे मनुष्यबळ आणि कैदी जास्त यामुळे या बेकायदेशीर कृत्यांना आवर घालताना प्रशासनाची तारांबळ उडते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने या सर्व बेकायदेशीर बाबी रोखण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍यांच्या माध्यमातून संपूर्ण कारागृहातील कैद्यांवर नजर ठेवण्याचा प्रयोग राबविण्याचे निश्‍चित केले आहे.

या कारागृहांमध्ये बसणार ड्रोन कॅमेरा

राज्यात 9 मध्यवर्ती कारागृह, 31 जिल्हा कारागृहे, 3 खुली कारागृहे; तसेच 172 उप-कारागृह आहेत. यामध्ये जवळपास 32 हजारांहून अधिक कैदी आहेत. राज्यातील येरवडा, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकरोड, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे या नऊ मध्यवर्ती कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह, अशा दहा कारागृहांत प्रथम ड्रोन सिस्टिम सुरू करण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

येरवडा कारागृहात यशस्वी चाचणी

येरवडा मध्यवर्ती कारागृहात आठवड्यापूर्वी ड्रोन कॅमेर्‍यांची ट्रायल घेण्यात आली असून, ती यशस्वी झाली आहे. कारागृहातील कंट्रोलरूममधून कर्मचारी व अधिकारी यावर देखरेख करणार आहेत. त्यातही सीसीटीव्ही नसणार्‍या भागात अचानक हे ड्रोन कॅमेरे फिरवले जाणार आहेत. तर, कारागृहाच्या आतील परिसरासोबतच कारागृहाच्या बाहेरील परिसरही ड्रोन कॅमेर्‍यांच्या टप्प्यात येणार आहे.

ड्रोन सुरक्षा मजबूत करण्यासाठी

राज्यातील कारागृहांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मात्र, त्यांची संख्या अपुरी आहे. येरवडा कारागृहात जवळपास 450 सीसीटीव्हींची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात 150 कॅमेरे आहेत. त्यामुळे परिसरावर बारीक नजर ठेवता येत नाही. निधी आणि येणारा खर्च यात मोठी तफावत आहे. सीसीटीव्हीपेक्षा ड्रोनला कमी खर्च आहे. त्यामुळे ड्रोन कॅमेर्‍यांचा पर्याय निवडण्यात आला असून, यामुळे कारागृह प्रशासनाला पूर्ण परिसरावर नजर ठेवता येईल. तर, अवैध प्रकार आढळताच तत्काळ समोर येईल. तसेच, त्यावर कारवाई केली जाणार आहे. कारागृहांच्या तटभिंतीच्या आतच काही अंतरावरून हे ड्रोन फिरवले जाणार आहेत. त्याचा इतर परिसराला कोणताही धोका नसेल. ड्रोनसाठी परवानगी घेण्याची गरज नसून, याबाबत गृहविभागाला पत्र देऊन कळविण्यात येईल, असे कारागृह विभागाकडून सांगण्यात आले.