Mon, Apr 22, 2019 16:03होमपेज › Pune › चालक-वाहकांच्या मर्जीने ‘चालणार’ नाही एसटी!

चालक-वाहकांच्या मर्जीने ‘चालणार’ नाही एसटी!

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:17AMपुणे : निमिष गोखले 

स्थानकात पाच वाजता येणारी एसटी सहा वाजता येते, चालक-वाहकांच्या मर्जीनुसार मार्गस्थ होते, पुढे त्यांच्याच मर्जीनुसार थांबे घेते आणि त्यांच्या मर्जीनुसार इच्छित ठिकाणी पोहोचवते...!  या आणि अशा अनुभवांमुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असल्याने कर्मचार्‍यांना ‘मार्गावर’ आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम (ग्लोबल पोसिशनिंग सिस्टिम) सुरू करण्यात येणार आहे.

काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ट्रॅकिंगचा वापर होत आहे. बस नेमकी कुठे आहे याची माहिती मिळतेच शिवाय प्रवाशांना वेळोवेळी एसएमएच्या माध्यमातून सुचना मिळते. या कंपन्यांच्या तुलनेने एसटीचा व्याप मोठा आहे. वेळ व सुविधांच्या बाबतीत गचाळ कारभाराने ही सुविधा एसटीत सुरु करण्याची गरज व्यक्त होत होती. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे आपली बस नेमकी कुठे आहे, त्याला किती विलंब होईल किंवा झाला आहे, जाण्याचा मार्ग व नकाशा, बसचा रजिस्ट्रेशन नंबर, चालकाचा मोबाइल नंबर आदी गोष्टी कळू शकतात. ऑनलाईन तिकीट काढणार्‍या प्रवाशांच्या फोन नंबरवर बसबाबत संदेश पाठविण्यात येतो. संदेशात दिलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यास बस ट्रॅक करता येते व बसचा सर्व तपशील प्रवाशांना-कळू शकतो. 

गोव्यात चांगला परिणाम

गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कदंबा या बसमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस बसविण्यात आले असून, पुणे ते गोवादरम्यान प्रवास करताना प्रवासी त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. 

गरज काय?

एसटीला का उशीर झाला आहे, ती कधी येणार, वाहतूक कोंडीत नेमकी बस कुठे अडकली आहे, याबाबतची माहिती आगारप्रमुख किंवा एसटी स्थानकातील कर्मचार्‍यांकडे नसते. प्रवासी कर्मचार्‍यांकडे वारंवार एसटीबाबत विचारणा करतात व पर्यायाने दोघांमध्ये वादविवाद होतात. ट्रॅकिंग सिस्टिममुळे प्रवाशांना आपापल्या मोबाइलवर बसबाबत संपूर्ण माहिती कळू शकणार असून, सुरक्षिततेसाठी मित्रमंडळी, नातेवाइकांना ती लिंक शेअरदेखील करू शकणार आहेत. 

असे आहे तंत्र

खासगी बसचालकाच्या समोर जीपीएस डिव्हाइस बसविण्यात येते. हे एक उपग्रह आधारित तंत्रज्ञान असून हे तंत्र अगदी अचूक बस ट्रॅक करते, असा दावा तज्ज्ञांनीदेखील केला आहे. 

अत्यल्प खर्च

ट्रॅकिंग सिस्टिम डिव्हाईसचा वनटाईम खर्च एसटी महामंडळाला उचलावा लागेल व तो खूपच कमी आहे, असे सांगितआले. दोन ते तीन हजाराची यंत्रणा बसमध्ये बसविल्यास प्रवाशांना कायमस्वरुपी फायदा होऊ शकतो.

असा आहे फायदा

1)दुर्दैवाने बसचा अपघात झाला तर नेमका तो कुठे झाला हे कळू शकते.
2)अपघातातील जखमींना लवकर वैद्यकीय मदत मिळू शकते. 
3)बस कोणी चोरून नेल्यास, बसचे अपहरण झाल्यास त्वरित कळू शकेल. 
4)बस कुठे आहे याचा मार्ग प्रवाशांना कळतो 
5)इच्छीतस्थळी पोहोचण्यास नेमका किती वेळ लागणार आहे, याबाबत कळते. 
6)मित्रमंडळी, कुटुंबीयांना लिंक शेअर केल्यास त्यांनादेखील बस सध्या कुठे आहे याची माहिती मिळते
7)फिडबॅक किंवा तक्रारीसाठीही याचा वापर करता येऊ शकतो.