Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Pune › मद्यपानामुळे यकॄताचे आजार वाढले

मद्यपानामुळे यकॄताचे आजार वाढले

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोकांमध्ये यकृताचे आजार वाढत आहेत. शहरातील जवळपास एक चतुर्थांश पुरूष मद्यपान करतात. त्यामुळे दरवर्षी हजारो लोक यकृत सिरोसीसच्या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडतात. हेपेटीइटिस सी आणि बी यानंतर मद्यपानामुळे यकृत सिरोसिस होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देतात. केवळ मद्यपानामुळेच नव्हे तर मद्यपान न करणार्‍यांनाही ‘फॅटि लिव्हर’ हा आजार जबाबदार आहे. 

यकृत (लिव्हर) सिरॉसिसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे प्रत्येक पाचपैकी एका भारतीयावर याचा प्रभाव पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात यकृत सिरॉसिसने होणारा मृत्यू हे 14 वे मोठे कारण असून ही संख्या सतत वाढत आहे. ज्या वेगाने या रोगाची वाढ होत आहे, त्यानुसार 2020 पर्यंत तो मृत्यूचे 12 वे सर्वात मोठा कारण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परदेशात वर्षाला सरासरी 25 ते 34 वर्षे वयोगटातील 10% रुग्णांचा मृत्यू हा यकृत सिरोसीसमुळे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

जागतिक आरोग्य संघटनेने 2017 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यकृताच्या आजाराने भारतात होणार्‍या मृत्यूंची संख्या 2,59,749 इतकी आहे. देशात होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 2.95% आहे. यामध्ये जगभरात भारताचा 63 वा क्रमांक आहे. याबाबत यकृततज्ज्ञ डॉ. हर्षल राजेकर म्हणतात की, एकदा सिरोसिस झाल्यानंतर तो परत बरा होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण याच्याबरोबर अनेक इतर समस्या देखील येतात. यामध्ये साइट्स, हैपॅटिक एन्सिफ्लोपॅथी व इतर संक्रमण होउ शकते. त्याच्यासाठी लिवर प्रत्यारोपणाचा उपचार पर्याय उपलब्ध आहे. परंतु अत्यंत कमी दाते आणि खर्चिक प्रक्रिया असल्याने हे सर्वांना शक्य होत नाही. 

यकृताचे आजार 40 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना अधिक होतात. लिव्हर सिरोसिसची समस्या सोडवण्याकरिता जीवनशैलीत बदल केल्यामुळे त्यापासून दूर राहता येऊ शकते. हा आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे, आहारात कार्बोहाइड्रेट्स, शर्करा आणि फॅ टचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. तसेच कर्बोदकाचे प्रमाण वाढविणे व 1400 कॅलरीपेक्षा कमी आहार घेणे आवश्यक आहे.     -डॉ. हर्षल राजेकर, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ, पुणे