Sat, Jul 20, 2019 13:05होमपेज › Pune › नाटककार कोल्हटकरांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

नाटककार कोल्हटकरांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर (वय 70) यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर (वय 65) यांचा घरातील किचनमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचा धक्‍कादायक प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. दरम्यान, शवविच्छेदनामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून अज्ञात व्यक्‍तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी दिलीप कोल्हटकर यांचे जावई ऋषीकेश रवींद्र चंद्रात्रे (रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अलंकार पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कोल्हटकर त्यांच्या पत्नी दीपाली आणि दीपाली यांच्या 88 वर्षीय आई अलंकार परिसरातील गुळवणी महाराज रोडवरील मिथाली को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फ्लॅट क्रमांक 3 मध्ये राहण्यास आहेत. दिलीप कोल्हटकर हे आजारपणामुळे गेल्या तीन वषार्र्ंपासून झोपूनच असतात. त्यांचा मुलगा अन्वय कोल्हटकर हा नोकरीनिमित्त परदेशात असतो. तर, मुलगी केतकी यांचा विवाह झाला असून, त्या त्यांच्या कुटुंबीयासोबत अलंकार परिसरातच राहण्यास आहेत. 
दरम्यान, दिलीप कोल्हटकर राहत असलेली सोसायटी चार मजली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिलीप कोल्हटकर यांच्या घरात धूर झाला. त्यामुळे दीपाली कोल्हटकर यांच्या आई यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले. त्यावेळी धुरामुळे त्यांना काहीच दिसले नाही. त्यांनी तत्काळ बाहेर येऊन आरडा-ओरडा करीत सोसायटीतील नागरिकांना माहिती दिली. येथील रहिवाशांनी कोल्हटकर यांच्या घरात धाव घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने रहिवाशांनी दिलीप कोल्हटकर यांची मुलगी केतकी यांना माहिती दिली. त्यांनी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळीही घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घराचे सर्व दरवाजे व खिडक्या उघडून धूर कमी केला. त्यावेळी दीपाली कोल्हटकर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शुक्रवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास अलंकार पोलिस करीत आहेत.

अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने खून झाला नसण्याची शक्यता आहे. घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरम्यान, दिलीप कोल्हटकर हे आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी परिचारक (अटेडन्ट) म्हणून एक व्यक्ती बारा तासासाठी येत असे. गुरुवारी तो देखभालीसाठी आला होता. मात्र, तो घटनेच्या एक तासापूर्वी साडेसात वाजेपूर्वी गेल्याचे सांगत आहे. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असून, यापूर्वी त्यांच्याकडे कामासाठी कोण-कोण होते; तसेच यापूर्वी असणारे गाडी चालक, मोलकरीण याबाबत माहिती घेतली जात आहे.
- रेखा साळुंखे, वरिष्ठ निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे