Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Pune › दुरुस्तीची नाटकं कधी थांबणार?

दुरुस्तीची नाटकं कधी थांबणार?

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:31AMपिंपरी ः पूनम पाटील

पिंपरी-  चिंचवड शहरात  विविध स्तरातून सांस्कृतिक चळवळ राबवण्यात येत असून पालिका प्रशासन आणि राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशातून शहरातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीचा वारंवार घाट घातला जात आहे. सततच्या दुरुस्ती कामांमुळे शहरातील रसिकांचा व कलाकारांचा हिरमोड झाला आहे.  शहरातील सांस्कृतिक चळवळीचा विकास होण्याऐवजी दुरुस्तीच्या नावाखाली  सांस्कृतिक विकासात अडथळा निर्माण होत आहे, अशी भावना कलाक्षेत्रात निर्माण होत आहे.  

नाट्यगृहांची दुरवस्था दुर करण्यासाठी दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. परंतू एकदा दुरुस्ती करुनही वारंवार दुरुस्ती करण्यात येत असेल तर यामुळे कलाकारांना नक्कीच अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच या  दुरुस्तीदरम्यान नाट्यगृहामध्ये विविध नाट्यमय घटना घडत असून दर सहा महिन्यांनी होणार्‍या दुरुस्तीची नाटकं थांबणार तरी कधी ? असा सवाल रसिकांनी केला आहे. 

गदीमा नाट्यगृहाच्या पूर्णत्वाला मिळेल का गती ? 

शहरातील दोन नावाजलेली नाट्यगृह सध्या दुरुस्तीच्या प्रपंचात अडकली आहेत. उर्वरीत नाट्यगृहांमध्ये जेमतेम कार्यक्रम सुरु आहेत. मात्र त्यातच सर्वाचे लक्ष लागून असलेले प्राधिकरणातील गदीमा नाट्यगृहाच्या बांधकामाला मात्र प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विलंब होत आहे.  कित्येक महिन्यांपासून प्राधिकरणातील गदीमा या अत्याधुनिक नाट्यगृहाचे काम सुरु  आहे.  मुळातच या नाट्यगृहाच्या उभारणी अनेकदा लालफीतीत अडकल्याने उशिर झाला आहे. त्यात आता तांत्रिक मुद्यांवर एकमत होत नसल्यान तसेच वारंवार बदल करावे लागले.

दुरुस्तीदरम्यान नाट्यमय प्रकार

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात मध्यंतरी भूताटकीचा अजब प्रकार उघडकीस आला होता. अगदी पूजापाठ करण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. त्यामुळे दुरुस्तीचे काम आणखीनच खोळंबून लांबणीवर पडले. त्यामुळे वारंवार दुरुस्ती करुनही निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे का , प्रा. मोरे प्रेक्षागृहाची दोनदा दुरुस्ती करुनही समस्या ‘जैसे थे’च होत्या. त्यामुळे नाट्यगृहांत दुुरुस्ती केली कि नाही व नसेल केली तर खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? असा सवाल नागरीकांतून होत आहे. दरम्यान दिग्दर्शक मनोज डाळींबकर म्हणाले,  दुरुस्ती किंवा नुतनीकरण करण्याआधी कलाकारांचा विचार करावानाट्यगृहांची दुरुस्ती बाबत सध्या मनमर्जी कारभार सुरु आहे. वारंवार नाट्यगृह दुरस्तीसाठी का बंद ठेवण्यात येतात. यामुळे कलाकारांची परवड होत आहे.