Sun, Jul 21, 2019 08:18होमपेज › Pune › येरवड्यात ड्रेनेज लाइनचे काम रखडले

येरवड्यात ड्रेनेज लाइनचे काम रखडले

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:15AM

बुकमार्क करा
येरवडा : वार्ताहर

येरवडा येथील हरीगंगा सोसायटी जवळ ड्रेनेज लाईनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. सोसायटीच्या प्रवेश द्वारासमोर धोकादायक असा खड्डा गेल्या अनेक दिवसांपासून काढून ठेवला आहे. याचबरोबर ड्रेनेजचे पाईप देखील रस्त्याकडेला तसेच पडून आहेत. या सर्व बाबीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून महापालिकेने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.

महापालिकेच्या मुख्य खात्यामार्फत मलनिसारण विभागाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुख्य ठेकेदाराने यासाठी सब ठेकेदार नेमून काम सुरू केले होते. डॉ.आंबेडकर कॉलेज, डॉ.आंबेडकर सोसायटी, अग्रेसन हायस्कूल समोर, तसेच हरी गंगा याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम काही प्रमाणात झाले आहे. कॉमरझोन समोर काम केल्यानंतर पुन्हा ड्रेनेजच्या पाईप उखडण्यात आल्या होत्या. काम सुरू असताना सुरक्षितेची कोणतीही काळजी ठेकेदारामार्फत घेतली जात नाही. तसेच काम झाल्यानंतर रस्त्यावर राडारोडा तसाच पडलेला असतो. काम सुरू असताना ड्रेनेज विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित नसतात. अशा परिस्थिती काही प्रमाणात काम झाले आहे. ठेकेदाराची वर्क ऑडरची मुदत संपल्यानंतर देखील काम अर्धवट अशाच स्थितीत आहे. 

मात्र हरी गंगा सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून केवळ खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्डयात वाहने किंवा नागरीक पडून जिवित हानी होवू शकते. सुरक्षितेचे कोणतीही उपाय योजना याठिकाणी करण्यात आलेली नाही. याचबरोबर पदपथा कडेला ड्रेनेजच्या मोठ्या आकाराच्या सिमेंट पाईप तसेच पडून आहेत. वाहतुकीला अडथळा होत असताना देखील याकडे महापालिका प्रशासन व वाहतुक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अर्धवट स्थितीत व निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
याबाबत ड्रेनेज विभागाचे अधिकारी तायडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काही कारणामुळे काम थांबविण्यात आले आहे. लवकरच काम पुन्हा सुरू करण्यात येईल.