Mon, Apr 22, 2019 16:12होमपेज › Pune › डॉ. रॉय यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

डॉ. रॉय यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

बनावट संस्थेच्या लेटरहेड वरून महापालिकेच्या  डॉक्टर बाबत बदनामीकारक मजकूर पसरवल्याप्रकरणी पिंपरी महापालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत, तर डॉ. हेमंत चिखलीकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी-चिंचवड परिमंडल तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील फिजिशियन डॉ. शंकर जाधव यांना वायसीएम’ रुग्णालयाच्या उपवैद्यकीय अधीक्षकपदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता होती. मात्र डॉ. जाधव यांना पदोन्नती मिळू नये, याकरिता महापालिकेतील डॉ. हेमंत चिखलीकर यांनी बनावट लेटरहेड’चा वापर  केला.

त्यावर खोटा व बदनामीकारक व मजकूर लिहला. ते पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आले. तसेच ते बनावट लेटरहेड आणि त्यातील मजकूर हा पुढे महापालिका वैद्यकीय विभागाच्या ‘ई-मेल’वरुन सर्व हॉस्पीटलमध्ये पसरवला. त्यामुळे डॉक्टर हेमंत चिखलीकर यांनी माझी बदनामी करुन मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार डॉ. जाधव यांनी तत्कालीन आयुक्तांकडे दिली होती. तसेच, बोगस संस्थेचे बनावट लेटरहेड’ बनवून त्याद्वारे बदनामीकारक मजकूर समाजात पसरवला होता. याबाबत न्याय मिळत नसल्याने डॉ. जाधव यांनी न्यायालयात दाद मागितली.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.7) दिलेल्या आदेशात डॉ. हेमंत चिखलीकर यांच्यावर 166, 420, 500, 504, 506, 34 आणि डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना आदेश देवून 156 अंतर्गत चौकशी करुन 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत डॉ. जाधव म्हणाले पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी डॉ. हेमंत चिखलीकर आणि डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना विचारले असता अद्याप आमच्या प्रयत्न काही आले नसल्याचे सांगितले.

 

Tags : Pimpri, Pimpri news, Anil Roy, Atrocity, file,