Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Pune › सोशल मीडियामुळे मानसिक विकृतीत वाढ : डॉ निकम

सोशल मीडियामुळे मानसिक विकृतीत वाढ : डॉ निकम

Published On: Apr 22 2018 2:17PM | Last Updated: Apr 22 2018 2:17PMपिंपरी : प्रतिनिधी

सोशल मीडिया हे खूप सामर्थ्यशाली तंत्रज्ञान असले तरी ते माणसासाठी आहे, माणूस त्या तंत्रज्ञानासाठी नाही म्हणून सोशल मीडिया वापरताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे असे प्रतिपादन समुपदेशक डॉ.सीमा निकम यांनी येथे केले.

जयभवानी तरुणमंडळ आणि कालीमाता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ’सोशल मीडिया-एक दुधारी शस्त्र!’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना डॉ निकम बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुधाकर पावशे होते या वेळी संयोजक माजी नगरसेवक मारुती भापकर ,काशिनाथ नखाते, वसंत काळे  उपस्थित होते. 

डॉ. निकम म्हणाल्या की, माणूस हा समाजप्रिय असतो. कबुतरे, दूत, पत्रलेखन, टेलिग्रॅम, टेलिफोन, पेजर, मोबाइल सोशल नेटवर्क अशा साधनांनी माणसाची संवादशैली उत्क्रांत होत गेली. वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक्स , सोशल मीडिया ही आता समाजमाध्यमे झाली आहेत. जलदता, सहजता, सुलभता सोपेपणा ही तंत्रज्ञान स्वीकारण्यामागची मानसिकता असते; सोशल मीडिया हे सर्व निकष पूर्ण करते. उपलब्ध माध्यमांपेक्षा सोशल मीडियावर एका क्षणात माणूस जगात कुठेही कनेक्ट होऊ शकतो. गुगलवरून माहितीचा प्रचंड स्त्रोत उपलब्ध झालेला आहे. असे डॉ. निकम म्हणाल्या. 

मोदी सरकार सत्तेत येण्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. मात्र सोशल मीडियाचा वापर योग्य की हानिकारक याचे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. असे सांगून डॉ. निकम म्हणाल्या, गुगलच्या सर्व्हेक्षणात भारतीय हे शुभेच्छा संदेश पाठवण्यात जगात आघाडीवर आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. इंटरनेटचा वेग मंदावतो म्हणून गुगलला ही दखल घेणे भाग पडले आहे. सोशल मीडियामुळे समोरासमोरचा संवाद हरवत चालला आहे. ग्रुप चॅटिंगमुळे गैरसमज वाढू लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. त्यामुळे जातीय तेढ, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा, विकृत लैंगिकता आणि हिंसा वाढत आहे.

मोबाइलच्या अतिवापरामुळे भारतात मानसिक रुग्णांची संख्या वाढली आहे,  सेल्फीच्या नादात अनेकांनी प्राण गमावले आहेत. बेचैनी, भयगंड, उतावळेपणा, दृष्टिदोष, शारीरिक व्याधी, सर्जनशीलतेचा र्‍हास, वेळेचा अपव्यय, कौटुंबिक कलह, मानसिक विकृतीत वाढ, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, आभासी जगात रमण्याची सवय असे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. यासाठी अत्यावश्यक असेल तेव्हाच सोशल मीडियाचा वापर करावा, असा सल्ला डॉ. सीमा निकम यांनी दिला. गोरख देवकाते, संतोष राठोड, दिगंबर बालुरे, अभिजित भापकर, शैलेश कोळी, सोन्या जाधव, नवनाथ सलगर, राहुल थोरात यांनी संयोजन केले.

Tags : Social Media, Lecture, Dr. Nikam, Ethics, Pune