डॉ. खुर्जेकर यांसह दोघे अपघातात ठार

Published On: Sep 17 2019 1:56AM | Last Updated: Sep 17 2019 1:41AM
Responsive image


तळेगाव दाभाडे ः पंक्‍चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला मागाहून आलेल्या  खासगी बसने धडक दिल्याने पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर आणि त्यांचे चालक ज्ञानेश्‍वर भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. 

डॉ. केतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. संचेती हॉस्पिटलचे अस्थिरोग विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचे ते चिरंजीव होते. डॉ. केतन खुर्जेकर यांचा आज वाढदिवस होता. द्रुतगतीवर उर्से टोलनाक्याच्या पुढे गहुंजेच्या हद्दीत रविवारी (दि. 15) रात्री साडेदहाच्या सुमारास अपघाताची घटना घडली. जयेश बाळासाहेब पवार व प्रमोद भिलारे हे दोघे निवासी डॉक्टर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  याबाबत जयेश बाळासाहेब पवार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की डॉ. केतन खुर्जेकर, जयेश पवार व प्रमोद भिलारे हे वैद्यकीय परिषदेसाठी  मुंबईला गेले होते. तेथील  कार्यक्रम उरकून ते द्रुतगतीवरून  पुण्याकडे  (एमएच  14 जीयू 1158) कारने  येत होते. त्यांची  कार रात्री  10.30 च्या दरम्यान उर्से टोलनाका पास करून पुढे  गहुंजे हद्दीत आली असता गाडीचा टायर पंक्‍चर झाला. पंक्‍चर काढण्यासाठी गाडीचा चालक खाली उतरला व त्यास मदत करण्यासाठी डॉ. केतन खुर्जेकर खाली उतरले. त्याच वेळी व्होल्वो बस (केए 56- 2555) मागून  कारवर आदळली. यात  पंक्‍चर काढणारा चालक  ज्ञानेश्वर विलास भोसले व डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर हे जागीच ठार झाले. तर गाडीत मागील सीटवर बसलेले जयेश बाळासाहेब पवार व प्रमोद भिलारे हे जखमी झाले.