Mon, Nov 12, 2018 23:25



होमपेज › Pune › डॉ. के. वेंकटेशम पुण्याचे पोलिस आयुक्त

डॉ. के. वेंकटेशम पुण्याचे पोलिस आयुक्त

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:32AM



पुणे : प्रतिनिधी

राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अकरा अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश गृहविभागाने सोमवारी दुपारी काढले. पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून डॉ. के. वेंकटेशम यांची नियुक्ती झाली आहे, तर नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांची वर्णी लागली आहे. कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.

नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून आतापर्यंत कार्यरत असलेले डॉ. के. वेंकटेशम हे मूळचे हैद्राराबाद येथील असून, ते 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपुरातील संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली. त्यापूर्वी त्यांनी पोलिस मुख्यालय मुंबई येथे पोलिस प्रशिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या काळात प्रशिक्षण केंद्रात मोठे बदल झाले. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. अतिरिक्त मुंबई महानगर (प्रशिक्षण व विशेष विभाग) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे़. त्यावेळी त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. 

त्यापूर्वी नक्षलप्रभावित गोंदिया येथे काम करताना त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी माहितीचे जाळे तयार केले होते. यातूनच त्यांनी नक्षलवादी गटाच्या कमांडरला अटक केली होती. नवे नक्षलवादी तयार होऊ नयेत, यासाठी अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले होते. 

मालेगाव आणि उस्मानाबाद या संवेदनशील ठिकाणीही त्यांनी काम केले़  त्यांच्या कार्याचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान करण्यात आला़. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी नोंदणी व इमिग्रेशनचे मुंबई विशेष शाखेत काम केले आहे़. गुप्तचर संस्थेचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़. अत्यंत शिस्तप्रिय, कडक आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून डॉ. वेंकटेशम यांची पोलिस दलात ओळख आहे. 
31 मार्च 2016 रोजी पुणे पोलिस आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला़. त्या पुण्याच्या दुसर्‍या महिला पोलिस आयुक्त ठरल्या़  शहरातील कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी अनेक चांगली पावले त्यांनी उचलली़. विशेषकरून महिला- तरुणींच्या सुरक्षिततेसाठी योजना बनविल्या़  बडीकॉप, पोलिस काका यासारखे उपक्रम सुरू केले़  ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, 24 तास हेल्पलाईन सुविधाही सुरू केली. गेल्यावर्षी बडीकॉपसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिक्कीचा पुरस्कारही पोलिस दलाला मिळाला आहे. यंदा ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या कामगिरीबद्दल देशातील सर्वात नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्याचा गौरव करण्यात आला़. 

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात पुणेकरांनी मोलाचे सहकार्य केले. माझ्या आयुष्यातील दु:खद घटनांमध्ये पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहिले. ज्येष्ठ नागरिक कक्ष, महिला सुरक्षिततेसंदर्भात विविध उपक्रम राबविले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. पुण्यातील कार्यकाळ उत्तम पार पडला असून, पुणेकरांचे मी आभार मानते.  - रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त