होमपेज › Pune › डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश दर्शनासाठी गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश दर्शनासाठी गर्दी

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:37PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयातील अस्थिकलशाला, तसेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनुयायांनी एकच गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेबांच्या जपून ठेवलेल्या वैयक्तिक वापरातील वस्तू आणि अस्थिकलशाचे दर्शन आंबेडकरप्रेमी मनोभावे घेताना दिसत होते. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण ज्या शय्येवर झाले, ती दिल्लीतील शय्या पुण्यात दर्शनासाठी खुली आहे. यासह त्यांच्या रोजच्या वापरातील सुमारे 280 वस्तू येथे मांडण्यात आल्या आहेत. सिंबॉयोसिस सोसायटीने या वस्तूंचे भव्य स्वरूपात संग्रहालय उभारलेले आहे. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय सांस्कृतिक वस्तू जतन आणि संशोधन संस्था’ या कामी संस्थेला मदत व मार्गदर्शन करते. 

याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅपही तयार करण्यात आलेले आहे. जेणेकरून त्यांच्या वस्तूंसमोर उभे राहून या वस्तूंची माहिती टॅब्लॅाईडवर ऐकण्याची सोय करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत आंबेडकरप्रेमींनी बाबासाहेबांच्या आठवणींना आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.