Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Pune › संयुक्त उपचार पद्धतीने पाठदुखीवर मात

संयुक्त उपचार पद्धतीने पाठदुखीवर मात

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 12:50AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पूर्वी पन्नाशीनंतर उद्भवणारे पाठीच्या कण्याचे आजार आजच्या जमान्यात पंधरा -सोळाव्या वर्षीच उद्भवू लागले आहेत; परंतु या आजारांवर आयुर्वेद आणि संयुक्त उपचार पद्धतीने मात करता येणे सहज शक्य आहे, असे उद्गार प्रसिद्ध संयुक्त उपचार पद्धती तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी काढले. 

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद अ‍ॅकॅडमी आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘रोगमुक्त समाजासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेमध्ये विविध रोगांचा समूळ नाश आयुर्वेदाच्या माध्यमातून कसा करता येतो, या विषयावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. परिषदेमध्ये ‘पाठीच्या कण्याचे आजार व संयुक्त उपचार पद्धतीने त्यातून मुक्तता’ या विषयावर ते बोलत होते. या परिषदेमध्ये भारतातील विविध राज्यांतून; तसेच पोर्तुगाल, ब्राझील, रुमानिया येथील आयुर्वेदतज्ज्ञ सहभागी झाले होते.

डॉ.पाटील  म्हणाले, बदललेली जीवनशैली, बैठे काम, बसण्याची चुकीची पद्धत, वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, अतिप्रवास, महिलांच्या बाबतीत गरोदरपण व त्यानंतर न घेतलेली काळजी, लहान मुलांचे मोबाईल व संगणकावर जास्तीत जास्त खेळणे, अशा अनेक कारणांमुळे पाठीच्या कण्याचे आजार उद्भवू  शकतात. 

संयुक्त उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला कोणता विकार झाला आहे याचे निदान आधुनिक वैद्यकानुसार करून, त्याच वेळी प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीचे आयुर्वेद; तसेच अन्य पारंपरिक वैद्यकानुसारसुद्धा निदान केले जाते. रुग्णाला लवकरात लवकर आराम मिळावा, रोगाचे मुळापासून उच्चाटन व्हावे, उपचारांचे दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी या सर्व उपचार पद्धतींचा योग्य वापर करून त्यातील निवडक उपचार रुग्णावर केले जातात.