Tue, Mar 26, 2019 21:53



होमपेज › Pune › ससूनचा कायापालट करणारे ‘डीन’ पुण्यातच राहू द्या!

ससूनचा कायापालट करणारे ‘डीन’ पुण्यातच राहू द्या!

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 1:01AM



पुणे : प्रतिनिधी 

येथील प्रसिद्ध ससून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा ‘सीएसआर फंडा’द्वारे बदलून टाकणारे आणि वैद्यकीय सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करणारे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईला बदली झाल्याचे वृत्त येथे धडकताच रुग्णालयातील सर्व घटकांनी शासनाच्या निर्णयाविरुद्ध एकत्र येत जोरदार मोहीम उघडली आहे. 

डॉ. चंदनवाले यांना येथेच ठेवण्यात यावे, यासाठी सह्यांची मोहीम, सरकारला पत्रे पाठवणे अशी चळचळच उभी केली आहे. त्यामुळे शासनावर प्रचंड दबाव आला असून, बदलीबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाला पुनर्विचार करावा लागणार आहे. एखाद्या अधिकार्‍याच्या बदलीविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व घटकांंनी एकत्र येण्याची ससूनच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, स्टुडंट कौन्सिल, अधिसेविका, नर्सिंग, परिचारिका, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, अधिष्ठाता कक्षातील कार्यरत कर्मचारी, ससूनमधील अधिकारी व कर्मचारी आदींनी चंदनवाले यांची बदली रद्द करण्याच्या निवेदनावर सह्या केल्या आहेत. हे निवेदन मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, डीएमईआर सचिव, राज्यपाल यांना पाठवले आहे. 

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले. त्यामध्ये त्यांना तत्काळ मुंबईत जे. जे. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. चंदनवलेही बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी नाखूष असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

‘सीएसआर फंड’ संकल्पना

डॉ. चंदनवाले हे साडेसहा वर्षांपासून पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय येथे कार्यरत आहेत. त्यांनी सर्व विभागांना अत्याधुनिक मशिन्स, किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांट, हायटेक कॅज्यूअल्टी यासह आणखी बरेच प्रलंबित विषय  मार्गी लावले. 

2013 मध्ये ‘सीएसआर’ कमिटी स्थापन करून उद्योग, सामाजिक संस्था, देवस्थान यांच्याकडून चिकाटीने 85 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा निधी मिळवून रुग्णालयाला अत्याधुनिक सुविधा उभ्या करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘सीएसआर फंड’ ची संकल्पना डॉ. चंदनवाले यांनी सरकारी रुग्णालयासाठी राज्यात प्रथमच राबविली आणि त्यांचे हे सर्वात मोठे यश ठरले आहे.शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनीही डॉ. चंदनवाले यांची बदली रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.