Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › भिक्षेकर्‍यांचा आरोग्यदूत!

भिक्षेकर्‍यांचा आरोग्यदूत!

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:04AMपिंपरी : वर्षा कांबळे

पुणे शहरातील मंदिराबाहेर अंध-अपंग, निराधार आणि ज्यांना नाईलाजाने भीक मागावी लागते, अशा व्यक्तींना माणुसकीच्या भावनेने रस्त्यावरच तपासून हवी तेवढी वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य डॉ. अभिजित सोनवणे आज कित्येक वर्षे करीत आहेत. एवढेच नाही तर भिक्षेकर्‍यांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोलाचे कामही करीत आहेत. 

आज ‘भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  डॉ.  सोनवणे यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात मंदिर आणि मशिदीबाहेर फिरणार्‍या भिक्षेकर्‍यांना औषध देऊन केली. कोणी त्यांना मुलगा मानलं तर कोणी नातू. डॉक्टरांनीही प्रेमापोटी सोमवार ते शनिवार रस्त्यावरच फिरून औषधे द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांना आधी वाटायचं की, औषध देऊन ते फार मोठे काम करीत आहेत. मात्र, नंतर जाणवले, रुग्णांना शारीरिक आधारापेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज आहे. यानंतर त्यांनी भिक्षेकर्‍यांना औषध देता देता भीक मागणे सोडून काम करायला प्रोत्साहन दिले. या गोष्टीचा प्रभाव पडल्याने भिक्षेकर्‍यांनीही ऐकायला सुरुवात केली.

हळूहळू डॉक्टरांनी भिक्षेकर्‍यांना काम द्यायला सुरुवात केली. उदा. शनि मंदिरात तेलाच्या पुड्या विकायला देणे, कोणाला वजनकाटा दिला, कोणाला फुले विकायला दिली. काही वृद्ध महिलांना सोसायटीमध्ये मुले सांभाळायचे काम दिले. काही पुरुषांना दाढीचे सामान देऊन दाढी करायचा व्यवसाय सुरू करून दिला. आजपर्यंत सर्वांच्या सहकार्याने 30 ते 40 आजी-आजोबा भीक मागायचे सोडून काम करीत आहेत. 

सुरुवातीला जरी औषध द्यायचे, या हेतूने ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ हा प्रकल्प चालू केला असला तरी डॉक्टरांनी भिक्षेकर्‍यांना शारीरिक व मानसिक आधार देऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकविले. आता मात्र, हा प्रकल्प राहिला नसून ती डॉक्टरांची कौटुंबिक जबाबदारी झाली आहे. भिक्षेकर्‍यांच्या वार्‍यासही उभे न राहणारे गावागावचे नागरिक आता भिक्षेकर्‍यांपर्यंत पोहचून त्यांच्या वतीने त्यांना काम करायला प्रोत्साहित करीत आहेत. आजतागायत 500 तरी नागरिक डॉक्टरांच्या मदतीने प्रेरित होऊन एका तरी भिक्षेकर्‍याला माणसात आणून नवजीवन देणार, या विचाराने झपाटून कामाला लागले आहेत. 

मी ज्यावेळी डॉक्टर झालो त्यावेळी कठीण परिस्थितीत मला आधार देण्याचे काम एका भिक्षेकरी कुटुंबाने  केले. त्यानंतर मला एका  आंतरराष्ट्रीय संस्थेत मोठ्या पदावर नोकरी मिळाली. भिक्षेकर्‍यांचा उतराई होण्यासाठी मी ती नोकरी सोडली आणि भिक्षेकर्‍यांचे पुनर्वसन करण्याचा विडा उचलला. रस्त्यावर फिरून औषध द्यायला सुरुवात केली. मनुष्याने देवाला आठवड्यातील प्रत्येक दिवस दिलेला आहे. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असेल त्यादिवशी त्या मंदिरात जातो. तेथील भिक्षेकर्‍यांना तपासतो. हे काम नियमितपणे दहा ते साडेचार वाजेपर्यंत करतो. - डॉ. अभिजित सोनवणे