Thu, Mar 21, 2019 11:36होमपेज › Pune › डोणजेत देशातील सर्वात वयोवृद्ध महिला

डोणजेत देशातील सर्वात वयोवृद्ध महिला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वेल्हे :  दत्तात्रय नलावडे

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील 120 वर्षांच्या पणजीबाई या देशातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याचे शुक्रवारी (दि. 24) सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. तीन शतकांच्या साक्षीदार असलेल्या या पणजीबाईंचे नाव रोशनबी नुरमहमंद शेख असे आहे. रोशनबी शेख यांची प्रकृती ठणठणीत आहे.

रोशनबी शेख यांचा जन्म 1897 च्या सुमारास पानशेत धरण भागातील आंबेगाव बुदुक (ता.वेल्हे) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडेखान पानसरे असे होते. त्यांना दोन भाऊ होते. सर्व भावंडात त्या मोठ्या आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी रोशनबी शेख यांचे लग्न डोणजे येथील नुरमहमंद शेख यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी मोठा मुलगा युसूफ हा दुसरीकडे स्थायिक झाला. धाकटा मुलगा मकबूल याचे निधन झाले.

त्याच्या पत्नी रहेमदबी या त्यांचा सांभाळ करीत आहेत. रोशनबी शेख यांना कोणताही आजार नाही. काही वर्षांपूर्वी रोशनबी शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना डॉक्टरकडे जावे लागले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय शस्त्रक्रिया करून तोडण्यात आला. अपंगत्वावर मात करत त्या स्वतः शौचास जातात. चालताना थकवा येत असल्याने त्या अंथरूणावर झोपून असतात. मात्र त्या अंथरूणावर उठून बसतात. दररोज सकाळी 7 वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. रोशनबी या स्पष्ट बोलतात.

त्यांना कमी ऐकू येते. सून बाहेरगावी गेल्यावर त्या  घरात एकट्या असतात. रोशनबी या बोलताना अडकळत नाहीत. समोरच्या व्यक्तीला त्यांचे बोलणे समजते. अस्सल मावळी मराठी भाषेत तसेच पारंपरिक हिंदी भाषेत त्या बोलतात. पानशेत, सिंहगड, डोणजे भागातील जुन्या आठवणी त्या सांगतात. रोशनबी शेख यांच्या दीर्घआयुष्याचे रहस्य येथील रहिवाशांना आश्चर्यचकित करीत आहे.