Sat, May 30, 2020 05:18होमपेज › Pune › पद्मावतीत महापालिकेच्या  दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी

पद्मावतीत महापालिकेच्या  दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 1:19AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पदमावती येथील महापालिकेच्या कै. शिवशंकर पोटे दवाखान्यात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या नंतर लहान बालकांना लस देण्यासाठी आलेल्या 20 ते 25 नातेवाईकांना डॉक्टरांच्या मनमानीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. साडेअकराच्या नंतर लस न देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक बालकांना लस न देताच माघारी जावे लागले. 

सातारा रोडलगत पदमावती पंपिंग स्टेशनच्या शेजारी महापालिकेचा हा दवाखाना आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार येथे दर शुक्रवारी लहान बालकांना पोलिओ, डीटीपी, गोवर, बुस्टर आदी डोस देण्यात येतात. यासाठी वेळ सकाळी साडेनउ वाजल्यापासून  दुपारी बाहयरुग्ण विभाग सूूरू असेपर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत असायला हवी. पण येथील डॉक्टरांनी त्यांच्या मनानेच या डोससाठी वेळ ही सकाळी साडेनउ ते साडेअकरा इतकी ठेवलेली आहे. या दरम्यान आलेल्याच रुग्णांची नोंद करण्यात येते.    

शुक्रवारी साडेअकराच्या नंतर डोस साठी बालकांना घेउन आलेल्या नातेवाईकांसाठी डॉक्टरांच्या आदेशाने येथील सूरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. यामुळे संतप्त झालेले पालक, सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्यामध्ये वादावादी झाली. मात्र शेवटी यावेळी लस पाजण्यासाठी आलेल्या तब्बल 20 ते 25 महिलांना डोस न देताच माघारी जावे लागले, अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली. याबाबत येथील मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहिणी तारू यांच्याशी संपर्क होउ शकला नाही. 

दवाखान्याला नाही नावाचा फलक

या दवाखान्याला इमारतीच्या बाहेरील बाजूस किंवा मुख्य प्रवेशद्वारावर कोठेही नावाचा फलक  नाही. त्यामुळे येथे येणा-या नवीन नागरिकांना तो दवाखाना कोठे आहे हे पाहण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.