Wed, Jun 26, 2019 12:13होमपेज › Pune › ‘वायसीएम’चा निष्काळजीपणा बाळाच्या जिवावर बेतला

‘वायसीएम’चा निष्काळजीपणा बाळाच्या जिवावर बेतला

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:14AMपिंपरी : प्रतिनिधी

गरिबांचे रुग्णालय अशी ओळख असणार्‍या महापालिकेच्या ‘वायसीएम’मध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा बाळाच्या जिवावर बेतला आहे. गर्भवती महिला उपचारासाठी आली. या वेळी ठरलेल्या वेळेत येण्याचे सांगून उपचार करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बाळाला जीव गमवावा लागला. त्यामुळे डॉक्टरांवर कारवाई कोण करणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

गर्भवती महिलेची पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यांना 25 मार्च ही बाळंतपणाची तारीख देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी (दि.21) पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे संबंधित महिलेला तिच्या पतीने रुग्णालयात आणले; मात्र संबंधित विभागातील एका महिला डॉक्टरने वेदना होत असूनही, तिला योग्य प्रकारे न तपासता दिलेल्या तारखेलाच या, असे सांगितले. त्या महिलेचा पती सोनोग्राफी विभागात गेला. त्यांना गर्दी असल्याने पुढची तारीख देण्यात आली. नाईलाजाने त्यांना पत्नीला घेऊन आहे त्याच अवस्थेत घरी परतावे लागले. 

दरम्यान, घरी आले असता महिलेची प्रकृती आणखी बिघडली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पत्नी बाळंतीण झाल्याचे तिच्या पतीला दिसले. त्याने त्वरित तिला परिसरातील एका रुग्णालयात नेले. तेथून तिला पुन्हा ‘वायसीएम’मध्ये पाठवण्यात आले. रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी नवजात मुलाला मृत घोषित केले. संबंधित महिलेच्या तपासणी कार्डवर ‘हाय रिस्क’ असे लिहिले होते; मात्र त्यानंतरही डॉक्टरांनी उपचाराला प्राधान्य दिले नाही, तर रुग्णाला या अवस्थेत पिंपरी ते चाकणचा प्रवास धोकादायक ठरण्याची शक्यता असतानाही त्यांना ‘अ‍ॅडमिट’ का करून घेतले नाही, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

‘अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍यांवर कारवाई करा’

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने नवजात अर्भकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपचारात दिरंगाई करून नवजात अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतरांसोबत हे न घडो !

सामान्य प्रसूती असतानाही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगा गेल्याचे संबंधित महिलेच्या पतीने सांगितले. माझा मुलगा आता परत येणार नाही; मात्र हा प्रकार इतरांसोबत होऊ नये, अशी विनंती करताना त्यांना अश्रू अनावर झाले. पहिला मुलगाही बाळंतपणात गेला होता. सोनोग्राफी वेळेत केली असती, तर त्यात बाळंतपणाची शक्यता स्पष्ट झाली असती, अशी प्रतिक्रिया महिलेच्या पतीने दिली.

 

Tags : Pimpri, Pimpri News, Yashwantrao Chavan Hospital, Doctor Negligence, Baby died