Sun, Apr 21, 2019 13:44होमपेज › Pune › स्वागत न केल्याने लग्नात दोन गटांत हाणामारी

स्वागत न केल्याने लग्नात दोन गटांत हाणामारी

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:27AMकामशेत : वार्ताहर 

मावळातील नायगाव हद्दीतील गुरुदत्त मंगल कार्यालयात करंजगाव येथील कुडले घरातील वधू व कशाळ भोयरे येथील जाधव घरातील नवरदेव यांच्या लग्न सोहळ्यात काही जणांचे स्वागत न केल्याने मानपानाच्या कारणावरून कुडले गट व गायकवाड गट यांच्यात हाणामारी झाली.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार  (दि. 26)  रोजी कुडले आणि जाधव परिवाराचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कैलास बबन गायकवाड, यशवंत बबन गायकवाड, विलास बबन गायकवाड व काशिनाथ बबन गायकवाड  (सर्व रा. कांब्रे, मावळ) आणि त्यांच्या सोबत असणारे 8 ते 10 जण  नाव व पत्ता माहिती नाही. या सर्वांनी  बेकायदा जमाव जमवून लग्न कार्यक्रमात मानपानाच्या कारणावरून योगेश मारुती कुडले (25), राजेश नारायण कुडले  (27), श्रीहरी नारायण कुडले (26), नारायण सदाशिव कुडले (55), महेश नारायण कुडले (30,  सर्व रा. करंजगाव, मावळ) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, लाकडी दांडके व दगडाने डोक्यात, तोंडावर, हातापायावर मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद योगेश मारुती कुडले यांनी दिली आहे.

तर मंगल कार्यालयात लग्नात उपस्थित असताना मारुती कुडले यांना माझा भाऊ यशवंत बबन गायकवाड यांनी माईकवरील  स्वागत बंद करा, लग्नाची वेळ झाली आहे, असे म्हणाल्याच्या कारणावरून मारुती कुडले, राकेश कुडले, नारायण कुडले, ज्ञानेश्वर कुडले, महेश कुडले व इतर चार ते पाचजण नावे माहिती नाहीत (सर्व रा. करंजगाव, मावळ) यांनी हातामध्ये काठ्या, गज, दगड घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने कैलास गायकवाड  (33), यशवंत गायकवाड, विलास गायकवाड, नितीन तुकाराम गायकवाड  (सर्व रा. कांब्रे, मावळ) यांना लोखंडी गज, दगडाने डोक्यात, हातावर, पायावर, पाठीत मारहाण करून शिवीगाळ  व दमदाटी केल्याची फिर्याद कैलास गायकवाड यांनी दिली आहे. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील करीत आहेत.