Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Pune › काटकसरीचे प्रदर्शन नको, कृतीत आणा

काटकसरीचे प्रदर्शन नको, कृतीत आणा

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:55AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

‘निमंत्रण पत्रिकांवरच्या खर्चास पालिकेची कात्री, सत्तारुढ पक्षनेत्यांचा पुढाकार’ या दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झालेल्या बातमीची भाजपात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘काटकसरीच्या धोरणाचे प्रदर्शन नको, ते कृतीत आणा’ या शब्दात आज भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांची पालिकेच्या एका कार्यक्रमात खाजगीत कानउघाडणी केली.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना दुसरीकडे महापालिकेने काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करावा. यासाठी पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेतर्फे  दरवर्षी छापल्या जाणार्‍या डायर्‍यांची छपाई यापुढे न करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्या पाठोपाठ पालिकेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांवरच्या खर्चासही कात्री लावण्याचे आदेश सत्तारुढ पक्षनेत्यांनी दिले आहेत.आता छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी संगणकावर काढलेल्या प्रिंट याच निंमत्रणपत्रिका असणार आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. 

महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्घाटन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्या निमंत्रणपत्रिका छापण्यासाठी वर्षाला 10 लाख रुपये खर्च येतो. कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर महापौरांकडून आयुक्तांना पत्र दिले जाते. नियोजन झाल्यावर निमंत्रणपत्रिकेचे प्रारुप जनसंपर्क विभागामार्फत तयार केले जाते. कार्यक्रमाच्या उंचीनुसार पाचशे ते एक हजार निमंत्रणपत्रिका छापल्या जातात. खासदार, आमदार, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांना या पाठविल्या जातात. मात्र, बर्‍याचदा या पत्रिकांचा गठ्ठा न वाटता तसाच पडून राहतो. या प्रकारास लगाम घालण्यासाठी पक्षनेते पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आता छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी संगणकावर काढलेल्या प्रिंट याच निंमत्रणपत्रिका असणार आहेत. त्याची अंमलबजावणीही सुुुरु झाली आहे. महापालिकेच्या वतीने गुरुवारी हेमू कलानी उद्यान येथे शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा सुशोभिकरण करुन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.  

या कार्यक्रमांच्या निमंत्रणासाठी संगणकावर काढलेल्या प्रिंट मान्यवरांना पाठविण्यात आल्या होत्या. पालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी यापूर्वी शंभर दोनशे निमंत्रणपत्रिका छापायच्या आणि दाखविताना जास्त दाखवायच्या तसेच जास्त छापल्या तरी सर्व वाटायच्या नाहीत हा प्रकार होत होता. तो रोखणे गरजेचे होते.पालिकेचे कार्यक्रम बर्‍याचदा ऐनवेळी, घाईत ठरतात. अशावेळी छापलेल्या निमंत्रणपत्रिका वाटून होणे अशक्य होते. म्हणूनच वायफळ खर्च कमी करण्यासाठी संगणकावर प्रिंट मारुन त्याच पत्रिका निमंत्रण म्हणून वाटण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढारीशी बोलताना सांगितले होते.मात्र भाजपात याची वेगळीच प्रतिक्रिया उमटली आहे. 

सत्तारुढ पक्षनेते झाले निरुत्तर

पिंपरीत शहीद हेमू कलानी यांचा पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. सकाळी अकरा वाजता नियोजित कार्यक्रमास पालकमंत्री सव्वाबाराच्या सुमारास, म्हणजेच सव्वा तास उशिरा आले. तोवर भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महापौर काळजे, स्थानिक नगरसेवक यांच्या   गप्पा सुरु असताना आ. जगताप यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांना फैलावर घेतले. निमंत्रणपत्रिकांवरचा खर्च वाचवणार, काटकसर करणार असे सांगता कशाला रे? काटकसरीचे प्रदर्शन करण्याऐवजी काटकसर कृतीत दिसू द्या, जे काही करायचंय त्याची चर्चा न करता अंमलात आणा असा टोला त्यांनी लगावला.  तसेच हेमू कलानी पुतळ्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी एवढा मोठा मंडप उभारलाय एकीकडे निमंत्रण पत्रिकेवरचा खर्च वाचवल्याचे प्रदर्शन करायचे अन् दुसरीकडे मांडवासारख्या बाबींवर  खर्च करायचा हे बरे नव्हे, पत्रकारांनी हे विचारलं तर काय उत्तर देणार असा सवाल आ. जगताप यांनी केल्याने पक्षनेते निरुत्तर व चांगलेच हिरमुसले झाले.