Thu, Jul 18, 2019 04:16होमपेज › Pune › भूसंपादनासाठी रखडणार नाही 

भूसंपादनासाठी रखडणार नाही 

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 1:06AMपुणे : दिगंबर दराडे

पुणे मुंबई-मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान वाहतूक करण्यात येणार आहे. याकरिता भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही. पुणे मुंबई एक्सप्रेसच्या साईडपटटीवर हायपरलूप उभारणे शक्य असल्याची माहिती पुणे महानगराचे आयुक्‍त किरण गित्‍ते यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणार्‍या या तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार असून, त्यासाठी संबंधीत कंपन्यांच्या अभियंत्यांचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह, नागरिकांना अधिक गतीने सेवा देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे. या प्रकल्पाचा दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे. कोणतेही प्रकल्प करत असताना सर्वप्रथम भूसंपादनाचा अडथळा मोठा आसतो. मात्र पुणे मुंबई हायपरलूपसाठी वेगळे भूसंपादन करण्याची आवश्यकता असणार नाही. केवळ स्टेशनसाठी काही जागेचे भूसंपादन करावे लागणार असल्याने हा प्रकल्प गतीने पुढे जाईल असे गित्‍ते यांनी सांगितले. 

यासाठी आवश्यक असणारी 70 टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ  शकते. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिकमार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. किरण गित्ते म्हणाले, हायपरलूपसाठी आवश्यक परवानगी, त्यासाठी लागणारी जमीन, अभियांत्रिकी आव्हाने, याबाबतची पाहणी सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि मुंबईतील संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी, शिवाजीनगर परिसरामध्ये हायपरलूपचे स्टेशन करता येऊ शकते का, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली होती. पहिला टप्पा 2021 पर्यत होणार पूर्ण ’हायपरलूप वन’सोबत करार पूर्ण झाला आहे. त्यानुसार, व्यवहार्यता अहवाल तयार करून 10 किमीच्या ऑपरेशनल ट्रॅकची निर्मिती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. हे काम 2021पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर, संपूर्ण मार्गाचे काम सुरू करता येणार आहे, असेही किरण गित्ते यांनी सांगितले.