Wed, Jan 22, 2020 02:02होमपेज › Pune › खासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन

खासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करत असताना डॉक्टरांना बाहेर खासगी प्रॅक्टिस करू देऊ नका, अशी तंबी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी अधिष्ठात्यांना दिली. पुणे विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांची बैठक बीजे महाविद्यालयात शनिवारी झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. 

कोल्हापूर येथील ‘सीपीआर’ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्‍तीस असलेले काही प्राध्यापक डॉक्टर बाहेर खासगी प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांची पडताळणी वैद्यकीय शिक्षण खात्यातील अधिकारी यांनी नागरी पोषाखात व रुग्ण बनून केली. त्यांना खासगी प्रॅक्टिस होत असल्याचे आढळल्याने तेथील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना पदावरून दूर करण्याची कारवाई केली, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली. इथून पुढे अधिष्ठात्यांनी शासकीय निवासस्थानी राहावे, असेही त्यांनी सुचविले. 

डॉक्टरांसाठी ‘इंन्सेंटिव्ह’

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत होणा-या एकुण मोफत शस्त्रक्रियांपैकी 80 टक्के शस्त्रक्रिया या खासगी रुग्णालयांत होतात. उरलेल्या 20 टक्केच  शासकीय रुग्णालयांत होतात. कारण डॉक्टरांना यामध्ये पगाराशिवाय ‘एक्स्ट्रा इनकम’ मिळत नाही. म्हणून महात्मा फुले योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांना आम्ही शस्त्रक्रियेच्या एकुण मंजूर निधीपैकी दोन ते पाच टक्के रक्‍कम ‘इन्सेंटिव्ह’ म्हणून देणार असल्याचा निर्णय विचाराधीन आहे. महिन्याभरात याचा निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. 

डॉक्टरच पळवतात पेशंट

मला सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांचा गेल्या 25 वर्षांपूर्वींपासूनचा चांगलाच अनुभव आहे. पगाराशिवाय अतिरिक्‍त पैसे मिळविण्यासाठी अनेक शासकीय सेवेतील डॉक्टर शासकीय रुग्णालयांत शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार करावयास आलेले रुग्ण बाहेर संधान असलेल्या खासगी रुग्णालयात पळवतात. त्यातून त्यांना ‘एक्स्ट्रा इनकम’ मिळतो. तसेच योजनेत मोफत उपचार करून देण्यासाठी अतिरिक्‍त रक्‍कम घेतात, अनेकांची वैद्यकीय बिले अडवली जातात, असेही अनुभव आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

खडसेंना मंत्रिमंडळात घेतल्यास भाजपचा फायदा 

जमीन घोटाळ्यात आरोपी असलेले एकनाथ खडसे यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीन चिट दिली आहे. आता जर त्यांना कोर्टानेही निर्दोष जाहीर केले तर त्यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. पण, त्यांना मंत्रिमंडळात घेतले तर मला आनंद होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. ‘भुजबळांवर जे आरोप आघाडी काळात लावण्यात आले होते. त्यामुळे आमच्या सरकारचा यामध्ये काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.