Fri, Jun 05, 2020 05:55होमपेज › Pune › ‘इंद्रायणी’त दूषित पाणी सोडू नका

‘इंद्रायणी’त दूषित पाणी सोडू नका

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:02AMपिंपरी : शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत मैला सांडपाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी अतिदूषित होत आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात आळंदीजवळील विश्रांतीगृहात रविवारी (दि. 1) बैठक झाली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या. या वेळी आमदार सुरेश गोरे, पर्यावरण विभागाचे सचिव सदस्य अबवलगम, पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, पर्यावरण विभागाचे प्रमुख शहर अभियंता आय्युब खान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, तसेच, तळेगाव, लोणावळा, आळंदी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी आदी उपस्थित होते.  

त्या- त्या भागातील मैला सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रियेची माहिती पर्यावरण मंत्री कदम यांनी घेतली. इंद्रायणी नदीत अशुद्ध सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, यांचीही माहिती त्यांनी घेतली. पिंपरी-चिंचवड शहराबाबत अधिकार्‍यांनी माहिती दिली. शहरातून 16 किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी वाहते. या भागात एकूण 25 एमएलडी मैला सांडपाणी तयार होते. त्यातील 16 ते 17 एमएलडी सांडपाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया करून ते इंद्रायणी नदीत सोडले जाते. अद्याप 7 ते 8 एमएलडी सांडपाणी शुद्धिकरणाची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. पालिका व अमृत योजनेतून चर्‍होली व चिखली येथे नवीन मैला शुद्धिकरण प्रकल्प तयार होत असून, तो डिसेंबरअखेरीत कार्यान्वित केला जाणार आहे.

त्यामुळे नदीत सोडल्या जाणार्‍या सर्व पाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया केली जाईल. सदर प्रकल्प वेगात मार्गी लावून 100 टक्के शुद्धिकरण करून सांडपाणी नदीत सोडण्याचा सूचना पर्यावरणमंत्री कदम यांनी दिल्या. राज्य औद्योगिक विकाम महामंडळाच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांतून रासायनिक दूषित सांडपाणी इंद्रायणीत सोडले जात आहे. एमआयडीसीत ‘सीईटीपी’ शुद्धिकरण प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यासाठी पालिकेने डीपीआर बनवून दिला आहे. या संदर्भात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक लावण्याची सूचना त्यांनी दिल्या.