Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Pune › लहान मुलांना स्मार्टफोन देऊ नका!

लहान मुलांना स्मार्टफोन देऊ नका!

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 12:24AM  
पुणे :  ज्ञानेश्‍वर भोंडे

डोळ्यांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी एक ते सहा वयोगटातील मुलांच्या हातात पालकांनी  स्मार्टफोन देऊ नये. तर सहा ते 12 वयोगटातील मुलांनाही दररोज एक तासापेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन देणे टाळावे, असे आवाहन शहरातील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे. मोठ्या व्यक्‍तींच्या डोळ्यांवर याचा फारसा अनिष्ट परिणाम होत नाही; पण डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे हा त्रास त्यांना होऊ शकतो 
सध्या स्मार्टफोनचे मुलांना वेड लागले आहे. त्यामधील असलेल्या विविध अ‍ॅप्लिकेशन्समुळे मुलांवर मानसिकदृष्ट्या आणि वर्तनुकीविषयक अनिष्ट परिणाम होत आहेत; पण त्याचबरोबर डोळ्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून स्मार्टफोनचा वापर कोणत्या वयापासून करायला हवा याचेही काही नियम घालून दिलेले आहेत. 

लहान मुलांमध्ये (1 ते 12 वयोगट) मोबाईल आणि डोळ्यांतील अंतर फार कमी असते. त्यामुळे त्याचा लाईट जवळून डोळ्यावर पडल्याने  बाहूल्या (टयूपिल) या आंकुचन पावतात. यामुळे डोळे कोरडे पडणे, दाह सुटणे, दुखणे आणि नंतर चष्मा लागतो. तर 12 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना जर अभ्यास किंवा इतर गरज असेल तर स्मार्टफोन द्यावा. तर 18 वर्षापर्यंत डोळ्यांचा पूर्ण विकास झाल्याने त्यांनी स्मार्टफोनचा जास्त वापर केला तरी नंबर लागेल इतका परिणाम होत  नाही. पण डोळे दुखणे, कोरडे पडणे, डोळा कमजोर होणे हे परिणाम दिसून येतात. 

त्यानुसार नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते एक ते सहा वयोगटातील मुलांना अजिबात स्मार्टफोन देऊ नये. तर सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी दिवसांतून एक तास वापर केला तरी चालतो. मोठ्यामध्ये स्मार्टफोन पकडण्याचे डोळयांपासूनचे अंतर हे 30 सेंटीमीटरच्या आसपास असावे.

आम्ही 1508 शाळांतील 6 ते 12 वयोगटातील साडेसात लाख मुलांच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यापैकी 91 हजार मुलांना चष्मा लागल्याचे आढळून आले. यापैकी 71 हजार मुले स्मार्टफोनचा वापर चार तासांपेक्षा अधिक करत असल्यामुळे चष्मा लागलेला आढळून आले. यावरून स्मार्टफोनचा मुलांवर जास्त परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी स्मार्टफोनच्या प्रकाशाचा डोळ्यांवर जास्त परिणाम होतो. अतिवापरामुळे डोळ्यांच्या तक्रारी घेउन सध्या रोज पाच ते दहा रुग्ण जे. जे. रुग्णालयात येतात.
            डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ, मुंबई