मुंढवा :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरू श्री तुकाराम महाराज पालखीसमवेत सोमवारी हडपसर आणि परिसरात सगळीकडे वातावरण विठ्ठलमय झाले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी पावनेनऊ वाजता तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी साडेअकरा वाजता वैदुवाडी चौक येथे आला. काळुबाई चौकापासुन मगरपट्टा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या नागरीकांनी तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच मोठ्या भक्तीभावावे सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले.
घोरपडी, भिमनगर, बीटीकवडे रोड, शिंदे वस्ती, मगरपट्टा, मुंढवा व केशवनगर परिसरातील नागरीक दुचाकी व चारचाकी वाहनाने मुख्य रस्त्यापर्यंत येत होते व नंतर मुख्य रस्त्यावर पायी जाऊन पादुकांचे दर्शन घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस तुकाराम शिंदे वतीने वारकर्यांसाठी मोफत औषध उपचार उपलब्द करून दिले होते. डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. पराग शितोळे, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अनंत तांबे यांनी यांनी वैदुवाडी चौकात वारक-यांना औषधे दिली. विभा गिरीष ट्रस्टच्या वतीने गहिनीनाथ हुमे व ट्रस्टच्या सदस्यांनी क्रोम माल चौकात वारक-यांना चहा व फळांचे वाटप केले.
यशोत्तम जनहित प्रतिष्ठानच्या वतीने वारकर्यांना बिस्कीटे, फळे व उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. संस्थेच्या गौरी वाबळे, अश्विनी कुतवळ व किरण कुतवळ, पार्थ वाबळे यावेळी उपस्थित होते. ज्ञानदिप बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व संविधान सोशल फाऊंडेशन व रिपाइं महिला आघाडीच्या वतीने वारकर्यांना खिचडी, चहा व केळींचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वसंत वाघमारे, रिपाइं महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष लिंबोनी वाघमारे, आशा सावंत उपस्थित होते.