Tue, Sep 25, 2018 06:36



होमपेज › Pune › दिव्यांगांनी चाखला आंब्याचा गोडवा

दिव्यांगांनी चाखला आंब्याचा गोडवा

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:12AM



पुणे : प्रतिनिधी

चिमुकल्या हातांमध्ये आंबे पकडून ते खाण्याच्या शर्यतीत जिंकण्याची चढाओढ करतानाच आंब्याचा गोडवा चाखत दिव्यांग व दृष्टीहिन मुलांनी धमाल केली. दृष्टीविना जीवन अनुभवणार्‍या आणि शारीरिक व मानसिक अपंगत्वाने जीवनाशी दोन हात करणार्‍या या चिमुकल्यांनी ‘निरंजन मँगो मस्ती’मध्ये सहभाग घेत आंब्यांवर यथेच्छ ताव मारला. 

चिमुकल्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवित आम्हीही तुमच्यामधील एक आहोत, या भावनेने यंदा वाहतूक विभागातील पोलिस काकांनीही आंबे खाणे स्पर्धेत सहभाग घेत चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणीत केला. 

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मस्ती या आंबे खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, महेश पारेख, शामसुंदर मुंदडा, विमल करनानी, संध्या झंवर, संस्थेचे भरत लढे, अजय झंवर, जगदीश मुंदडा यांसह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष होते.

अशोक मोराळे म्हणाले, वाहतूक नियमनासोबतच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीसह सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याकरीता पोलिस प्रशासन नेहमीच सक्रिय आहे. पोलिसांविषयी लहान मुलांमध्ये असलेली भिती दूर व्हावी आणि त्यांनी गरजेच्या वेळी पोलिसांकडे यावे, याकरीता या उपक्रमात वाहतूक शाखेने सहभाग घेतला आहे. रस्त्यावर वाहतूक नियमन पोलिस करीत असल्याचे लहान मुले अनेकदा पाहतात, त्यामुळे पोलिसांविषयी त्यांच्या मनात अनेकदा भिती निर्माण होते. त्यांच्या मनातील ही भिती दूर करुन त्यांच्याशी पोलिस काका हे नाते घट्ट करण्याकरीता आम्ही पुढाकार घेतला आहे.  

पिवळ्याधम्मक हापूस आंब्यांची मेजवानी आणि डिजेच्या तालावर थिरकण्याची संधी मिळाल्याने दिव्यांग आणि वंचित-विशेष मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वहात होता. आंबे खाणे स्पर्धेतील आंब्याच्या सुमारे 2 हजार 500 कोयी संस्थेचे कार्यकर्ते पुण्याजवळील ग्रामीण भागात पेरणार असून या माध्यमातून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावर्षी लोकमंगल फाऊंडेशन, जुन्नर मतिमंद मुलांची शाळा, माहेर संस्था, लुई ब्रेल अंध मुले व मुली, नूतन समर्थ विद्यालय, पिनॅकल रिक्रिएशन या संस्थेतील 250 पेक्षा अधिक विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. 

Tags : Divyaange, tasted, mangoes, sweetness,